वास्को :
दाबोळी विमानतळावरून बंगळुरूला जाण्यासाठी बोर्डिंगच्या रांगेत थांबलेल्या त्या दोघांनी ‘उसके बॅग में बॉम्ब है’ अशी आपसात चर्चा सुरू केली. हे ऐकताच तिसऱ्या प्रवाशाची पायाखालची वाळू सरकली. त्याने सुरक्षा रक्षकांना ही माहिती सांगितल्यानंतर मंगळवारी (दि. १५) मध्यरात्री विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेची झोपच उडाली. गोव्यातून बंगळुरूला जाणाऱ्या ‘इंडिगो एअरलाईन्स’मध्ये बसण्यापूर्वी दोघांना ताब्यात घेण्यात आले. अतुलकुमार केवट (२९, रा. मध्यप्रदेश) आणि त्याची सहकारी त्रितिया जना (२९, रा. कोलकाता) अशी त्यांची नावे आहेत. या अफवेच्या गदारोळात विमानाच्या उड्डाणालाही विलंब झाला.
याबाबत पोलिस उपअधीक्षक सलीम शेख यांनी सांगितले की, मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. दाबोळी विमानतळावरून बंगळुरूला १.१५ वाजता इंडिगो एअरलाइन्सची फ्लाइट होती. प्रवासी बोर्डिंगच्या रांगेतून विमानात जात असताना महिला व पुरुष प्रवाशांमध्ये बॅगेत बॉम्ब असण्याबाबत चर्चा सुरू होती. ती तिसऱ्या प्रवाशाच्या कानावर आली. ‘उसके बॅग में बॉम्ब हैं’ अशी चर्चा कानावर पडताच त्याने एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी त्वरित दोन्ही प्रवाशांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यानंतर लगेच त्या विमानाचीही तपासणी करण्यात आली. तपासणीत काहीच धोकादायक नसल्याचे उघड झाल्यानंतर विमान बंगळुरूला रवाना झाले.
दरम्यान, बुधवारी सकाळी ११.३० वाजता इंडिगो एअरलाईन्सचे दाबोळीवरील विमानतळ व्यवस्थापक जस्टीन गोवी यांनी या दोन्ही प्रवाशांबाबत विमानतळ पोलिसांकडे तक्रार देऊन त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. दोघे रांगेत थांबून बॉम्बची चर्चा करत होते. ते अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत होते की त्यामागे अन्य काही हेतू होता, याची चौकशी सुरू असल्याची माहीती पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली.