पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी - गोवा: सांताक्रुझ येथील बोंडवेल तळे आटणे अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमरा बसवले जातील अशी माहिती सांताक्रुझ पंचायतीच्या सरपंच जेनिफर दे ओलेव्हिरा यांनी दिली.
बोंडवेल तळ्याच्या पाहणी नंतर त्या बोलत होत्या. यावेळी पूर्ण पंचायत मंडळ उपस्थित होते. सदर पाहणी अहवाल तयार करुन जलस्त्रोत खाते, गोवा जैवविविधता मंडळ व जुने गोवे पोलिसांना सादर केला जाईल. व्हॉल्व सोडल्याने तळ्याचे पाणी आटले असून ज्यांनी कोणी ही कृती केली त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
ओलेव्हिरा म्हणाल्या, की बोंडवेल तळ्याचा पाणथळ क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे. अशा स्थिती कुणतीरी मुद्दामहू हा व्हॉल्ल खुला करुन तळ्याची पाणी ओढून घेतले आहे. त्यामुळेच तळ्याचे पाणी आटले आहे. या तळ्याला जैवविविधतेच्या दृष्टीने बरेच महत्व आहे. तसेच या तळ्याचे पाणी विशेष करुन वायंगणी शेतीसाठी वापरले जाते. पावसाळ्या नंतर मे महिन्यांपर्यंत हे तळे पाण्याने भरलेले असते. मात्र आता डिसेंबर पूर्वीच ते आटल्याने ही गंभीर बाब आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील विहिरी देखील आटण्याची भीती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.