ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ३१ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांना पदावरून हटवून भाजपने आपण व संघ म्हणजे एकच आहोत हे दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार पांडुरंग मडकईकर यांनी बुधवारी येथे व्यक्त केली.
रोहन खंवटे, विजय सरदेसाई, नरेश सावळ या आमदारांच्या उपस्थितीत पत्रकारांशी बोलताना मडकईकर म्हणाले, की भाजप वेगळा व संघ वेगळा असे दावे अनेकवेळा केले जात होते. भाजप संघावर काहीच लादू शकत नाही, असेही सांगितले जात होते. मात्र भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या माध्यमातून वेलिंगकर यांनी भाजपच्या सत्तेला आव्हान दिल्यानंतर व नव्या राजकीय पक्षाची भाभासुमंने घोषणा केल्यानंतर वेलिंगकर यांना संघ प्रमुख पदावरून काढून टाकले गेले. यावरून लोकांना सत्य काय ते स्पष्टपणो कळाले आहे. भाजप व संघ हे दोन्ही एकच आहेत हे यावरून स्पष्ट होत आहे. भाजप व संघ हे दोन्हीही वेलिंगकरांबाबतच्या घटनेमुळे उघडे पडले आहेत. भाजप आमच्यावर वर्चस्व ठेवू शकत नाही हा संघाचा दावा त्यामुळे फोल ठरतो.
आमदार सरदेसाई यावेळी म्हणाले, की भाजपमध्ये सहिष्णुता व सहनशिलतेच्या विचाराला थारा नाही हेच वारंवार स्पष्ट होत आहे.
वन मंत्री राजेंद्र आर्लेकर म्हणाले, की स्वत:चे निर्णय घेण्याएवढा संघ सक्षम आहे. त्यामुळे वेलिंगकर यांच्याविषयी संघाने जो निर्णय घेतला तो संघाचा अंतर्गत विषय आहे. आपण संघाच्या त्या निर्णयाविषयी काही बोलत नाही. गोव्यात भाजप दिवसेंदिवस बळकट होत असून भाजप व म.गो. युती अबाधित राहील.