पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे दोन दिवसांपूर्वी कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शनिवारी त्यांच्या कार्यालयातील दोघे वरिष्ठ अधिकारी कोविड पॉझिटिव्ह आढळून आले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात विशेष सेवा अधिकारी (ओएसडी) उपेंद्र जोशी यांनी कोविड चाचणी करून घेतली व ते पॉझिटिव्ह आले. तसेच याच कार्यालयातील खासगी सचिव गौरीश कळंगुटकर यांचीही कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली.मुख्यमंत्री सावंत यांनी होम आयसोलेशन स्वीकारलेले आहे. ते आल्तिनो येथील सरकारी बंगल्यावरून काम करतात. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोविड चाचणी करून घ्यावी, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्यानुसार जोशी तसेच खासगी सचिव कळंगुटकर यांनी कोविड चाचणी करून घेतली. शनिवारी त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आपण कोविड पॉझिटिव्ह झाल्याचे जोशी यांनी स्वत: सोशल मीडियावरून लगेच जाहीर केले. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी चाचणी करून घ्यावी, असाही सल्ला जोशी यांनी दिला आहे.राज्यात सध्या पाच हजारच्या आसपास सक्रिय कोविड रुग्ण आहेत. एकूण २० हजार जणांना गेल्या सहा महिन्यांत कोविडची बाधा झाली व त्यापैकी पंधरा हजार लोक आजारातून बरे झाले. सध्या काही सरकारी व खासगी इस्पितळातील खाटा कोविड रुग्णांनी भरल्या आहेत. प्लाज्मा दानासाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहन सातत्याने सरकार करत आहे. आरोग्य खात्याचे संचालक डिसा हेही कोविड पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यातील चाळीसपैकी आतापर्यंत सहा आमदार कोविड पॉझिटिव्ह ठरले. दोघा माजी मंत्र्यांना यापूर्वी कोविडची लागण झाली. त्यापैकी एका माजी आरोग्य मंत्र्याचे निधन झाले.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात दोघे अधिकारी पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 1:29 PM