पणजी : स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या दोन्ही मुलांनी भारतीय जनता पक्षाचे काम करावे, अशी विनंती भाजपने दोन्ही मुलांना केली आहे. उत्पल व अभिजात हे पर्रीकर यांचे दोन विवाहित मुलगे आहेत. पर्रीकर यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या पहिल्या भेटीत राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश खन्ना यांनी तुम्ही पर्रीकर यांच्याप्रमाणेच भाजपाचे काम करावे, अशी विनंती त्यांना केली. ही माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.पर्रीकर यांचा मुलगा पणजी मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार आहे काय, असे पत्रकारांनी विचारताच, तेंडुलकर म्हणाले की तसा कोणताच विषय झालेला नाही. माझ्यापर्यंत तरी तशी चर्चा आलेली नाही. फक्त पक्षाचे काम करावे एवढीच विनंती केली गेली. वडिलांनी जसे भाजपाचे काम केले, तसेच मुलांनीही ते सुरू ठेवावे, अशी विनंती खन्ना यांनी केली. ती विनंती मान्य करावी की फेटाळावी हे ठरविण्यासारखी स्थिती नव्हती. कारण दोन्ही मुलांना निधनाचे दु:ख होते व त्यामुळे जास्त चर्चा झाली नाही.दरम्यान, पर्रीकर यांच्या अस्थींचे चाळीस कलश भाजपाकडून तयार करण्यात आले आहेत. हे कलश सोमवारी भाजपच्या गट अध्यक्षांच्या हाती देण्यात आले. चाळीसही विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मंगळवारी एकाच दिवशी हे कलश फिरविले जातील. त्यानंतर रात्र होण्यापूर्वी मंगळवारीच गावांतील नद्यांमध्ये अस्थींचे विसर्जित करण्यात येईल. कलश प्रदान करण्याचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी भाजपाच्या मुख्यालयासमोर झाला. त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विनय तेंडुलकर, मंत्री विश्वजित राणे आदी उपस्थित होते. पर्रीकर यांना शासकीय पातळीवरून श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम कला अकादमीत होणार आहे. पर्रीकर यांच्या जीवनावर एक पुस्तकही सरकार प्रकाशित करणार आहे. लोकांनी त्यासाठी लेखन करावे, असे आवाहन सावंत यांनी केले.
पर्रीकरांच्या दोन्ही मुलांनी भाजपाचे काम करावे, पक्षाची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 7:19 PM