पणजी : विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय स्तरावर भाजपाकडून महिलांना पुरेशा प्रमाणात उमेदवा-या दिल्या जात आहेत, असा दावा पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती विजया रहाटकर यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीत गोव्यात दोन्ही जागा भाजपा जिंकेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्रीमती रहाटकर यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीलाही उपस्थिती लावली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांचे गोव्यात महिलांना उमेदवारीच्या बाबतीत डावलले जाते याकडे लक्ष वेधले असता भाजपा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे. गोव्यातील स्थिती मला माहीत नाही, परंतु राष्ट्रीय स्तरावर याआधी पुरेशा प्रमाणात महिलांना तिकिटे दिली गेलेली आहेत, असे त्या म्हणाल्या. महिलांना ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक भाजपानेच आणले. महिलांना उमेदवा-या मिळाव्यात यासाठी महिला मोर्चाचे प्रयत्न असतील, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक बूथवर १0 महिला
लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपा जिंकणार, असा दावा करताना पक्षाच्या कल्याणकारी योजना घराघरात पोचविल्या जातील, असे त्यांनी सांगितले. १६५0 पैकी १४00 बूथवर काम झालेले आहे. ३१ जुलैपर्यंत उर्वरित २५0 बूथवरही आम्ही पोहचू. प्रत्येक बूथवर १0 महिला काम करतील, असे त्या म्हणाल्या. जेव्हा जेव्हा गोव्यातील दोन्ही जागा भाजपाने जिंकलेल्या तेव्हा तेव्हा केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झालेले आहे, अशी पुष्टीही जोडताना गोवा याबाबतीत पक्षाला लकी ठरल्याचे सुतोवाच केले.
‘हलालच्या कुप्रथेला केंद्र कोर्टात विरोध करणार’
केंद्र सरकारबरोबरच गोव्यातील भाजपा सरकारनेही महिलांना लाडली लक्ष्मी, गृहआधार यासारख्या कल्याणकारी योजना दिल्या. त्याचा लाभ हजारो महिला घेत आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी महिलांसाठी येथे चांगले काम केले आहे, असे कौतुकाचे उद्गारही त्यांनी काढले. रहाटकर म्हणाल्या की, भाजपाने नेहमीच विकासाचे राजकारण केले. केंद्र सरकारने ‘मातृत्त्व सुरक्षा योजना’ यासारखी महत्त्वाची योजना दिली. तिहेरी तलाक कोर्टाने अवैध ठरवावा, यासाठी केंद्राने समर्थन दिले. मुस्लिम समाजात हलालची कुप्रथा आहे त्यालाही केंद्र सरकार कोर्टात विरोध करणार आहे.
दरम्यान, भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत संघटनात्मक बाबतीत चर्चा झाल्याचे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले. परंतु याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. पत्रकार परिषदेस भाजपाच्या प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा सुलक्षणा सावंत, राज्य कार्यकारिणी उपाध्यक्षा कुंदा चोडणकर, महिला प्रभारी श्रीमती कौशल्या ब्रार, पूनम सामंत, सपना मापारी, शीतल नाईक व इतर उपस्थित होत्या.