लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपचे दोन्ही उमेदवार आपले अर्ज आज मंगळवारी तर इंडिया आघाडीचे दोन्ही उमेदवार उद्या रामनवमीला सादर करणार आहेत.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस अॅड. नरेंद्र सावईकर यांनी पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली की, भाजपच्या दोन्ही लोकसभा उमेदवारांची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असून, दुसरी फेरी सध्या सुरू आहे. पल्लवी धंपे व श्रीपाद नाईक हे दोन्ही उमेदवार आपापले अर्ज आज दुपारी अनुक्रमे मडगाव व पणजी येथे सादर करणार आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, भाजपाचे पदाधिकारी यावेळी हजर असतील.
पल्लवी सकाळी १० वाजता पक्षाच्या मडगाव येथील कार्यालयात येणार आहेत. यानंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात त्या अर्ज सादर करतील तर उत्तर गोवा उमेदवार श्रीपाद नाईक सकाळी ११ वाजता पणजी येथील पक्ष कार्यालयात येणार आहे. व त्यानंतर ते उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करतील.
इंडिया आघाडीचे उमेदवार रमाकांत खलप व विरियातो फर्नांडिस उद्या रामनवमीला अर्ज सादर करतील, अशी माहिती कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यानी दिली. आरजीचे उमेदवार १८ रोजी अर्ज सादर करणार आहेत. १९ एप्रिल ही अर्ज सादर करण्यासाठी शेवटची तारीख आहे.
दरम्यान, पर्ये मतदारसंघाच्या आमदार दिव्या राणे यांनी सोमवारी वास्कोत दक्षिण गोवा भाजप उमेदवार पल्लवी धेपे यांच्यासाठी प्रचार केला. दिव्या राणे यांनी मेस्तावाडा येथील राम मंदिरात आयोजित कोपरा बैठकीत, ब्रम्हस्थळ मंदिरात आयोजित कोपरा बैठकीत आणि इतर ठिकाणी उपस्थिती लावून मान्यवरांबरोबरच पल्लवी धेंपे यांच्यासाठी प्रचार केला.