लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार दिगंबर कामत यांच्यासह ८ आमदारांविरुद्धच्या प्रकरणातील काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांची याचिकाही सभापती अपात्रता रमेश तवडकर यांनी त्याच मुद्द्यावर फेटाळली, ज्या मुद्द्यावर त्यांनी डॉग्निक नोन्होना यांची याचिका फेटाळली होती.
संपूर्ण काँग्रेस पक्ष विलीन झाला नसून काँग्रेस विधीमंडळ पक्ष भाजपात विलीन झाल्याचे शिक्कामोर्तब सभापतींनी आपल्या निवाड्यातून केले आहे. यामुळे अपात्रतेच्या दोन्ही प्रकरणातून ८ आमदारांना दिलासा मिळाला आहे. दोन्ही याचिका एकाच निकषावर फेटाळण्यात आल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या याचिकेवरही हाच निकष महत्त्वाचा ठरणार हे स्पष्ट संकेत आहेत.
आमदार आलेक्स सिक्वेरा, दिगंबर कामत यांच्यासह मायकल लोबो डिलायला लोबो, केदार नाईक, रुदोल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर आणि राजेश फळदेसाई यांच्या बाबतीत हा मोठा दिलासा ठरला आहे. कारण, या आदेशाला जरी याचिकादाराने उच्च न्यायालयात आव्हान दिले तरी न्यायालयीन प्रक्रियेत वेळ होण्याची शक्यता असल्याने लवकर निवाड्याची अपेक्षा असत नाही. तोपर्यंत आमदारांचा पाच वर्षांचा कार्यकाल होऊनही जाण्याची शक्यता असते.
सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसच्या ८ आमदारांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. हे पक्षांतर नव्हे तर काँग्रेस पक्ष भाजपात विलीन केल्याचा दावा त्यांनी केला होता. काँग्रेसचे नेते डॉम्निक नोहोना, गिरीश चोडणकर आणि अमित पाटकर यांनी सभापतींकडे अपात्रता याचिका सादर केल्या होत्या. या याचिका ठराविक वेळेच्या मुदतीत निकालात काढण्याची मागणी करून चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती.