मडगाव : धार्मिक स्थळांच्या मोडतोड प्रकरणातून धडाधड सुटत असलेला फ्रान्सिस्क परेरा उर्फ बॉय हा लोटली क्रॉस तोडफोड प्रकरणातूनही निर्दोष मुक्त झाला. त्याच्या विरोधात कुठलाही सबळ पुरावा कोर्टासमोर आणण्यास मायणा-कुडतरी पोलिसांना अपयश आल्याने मडगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सई प्रभूदेसाई यांनी त्याला आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्तता केली. आतापर्यंत फ्रान्सिस्क परेरा दहा प्रकरणांतून निर्दोष मुक्त झालेला असून अजुनही दक्षिण गोव्यातील चार न्यायालयात त्याच्या विरोधात आणखी पाच खटले प्रलंबित आहेत. या दहाव्या प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यावर संशयित बॉय हसत हसत न्यायालयाच्या बाहेर आला.कारवोता-लोटली येथील क्रिस्टल रॉकजवळ असलेल्या बॉ जिजस क्रॉसची 13 जुलै 2017 रोजी मोडतोड करण्यात आली होती. मायणा कुडतरी पोलिसांनी नंतर या प्रक़रणात संशयिताला अटक केली होती. सदर संशयिताने हातोडय़ाने या क्रॉसवर प्रहार करुन त्याची मोडतोड करुन धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र या प्रकरणात पोलीस कुठलाही पुरावा न्यायालयासमोर आणू शकले नाहीत. या प्रकरणात संशयिताच्यावतीने अॅड. समीर देसाई यांनी बाजू मांडली.जून व जुलै या दोन महिन्यात दक्षिण गोव्यात लागोपाठ धार्मिक स्थळांची मोडतोड होण्याच्या घटना घडत होत्या. या प्रक़रणात नंतर कुडचडे पोलिसांनी व्यवसायाने टॅक्सी ड्रायव्हर असलेल्या या बॉयला अटक केली होती. पोलिसांच्या दाव्याप्रमाणो रात्रीच्यावेळी भाडी घेऊन जाताना येताना सदर संशयित रस्त्याच्या बाजूला असलेल्या धार्मिक स्थळांची मोडतोड करत होता. पुतळे व क्रॉसमध्ये वाईट शक्ती लपलेल्या असतात असा वहिम असल्यामुळे या शक्तींना मुक्त करण्याच्या उद्देशाने तो ही कृत्ये करायचा असा खुलासा नंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या विधानसभेत केला होता. मागच्या बारा वर्षात या बॉयने संपूर्ण गोव्यात अशाप्रकारे दीडशेपेक्षा अधिक धार्मिक स्थळांची मोडतोड केल्याचा आरोप त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर ठेवला होता.
धार्मिक स्थळांची मोडतोड : सबळ पुराव्याअभावी बॉयची निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 6:05 PM