सखाराम मालवणकर, पेडणे
भारत सरकारच्या आस्था स्पेशल ट्रेनमुळे अयोध्या दर्शनाचा योग आला. तीन दिवस अयोध्येला जायचे आणि तीन दिवस यायचे, अयोध्येला राहण्याचा एक दिवस असे सात दिवस, गोमंतकीय सहप्रवाशांच्या प्रेमळ सहवासामुळे आणि सरकारच्या उत्कृष्ट व्यवस्थेमुळे प्रवास अतिशय सुखकर झाला.
अयोध्येच्या मुक्कामात आम्ही श्री राम मंदिराचे, रामलल्लाचे दर्शन घेतले. तत्पूर्वी श्री हनुमान गढीतील श्री हनुमंताचे दर्शन घेतले. रामदर्शनापूर्वी हनुमान दर्शन घेण्याची प्रथा आहे. नूतन राममंदिर नुसते सुंदर नाही तर कल्पनातीत सुंदर आहे. शुभ्र संगमरवरी दगडांनी बांधले असून प्रत्येक दगडावरील देवादिकांच्या सुरेख मूर्ती डोळ्यांचे पारणे फेडतात
भक्तांची एवढी प्रचंड गर्दी की कशीबशी वाट काढत आम्ही मंदिराकडे निघालो. सुरक्षा पोलिस बहुसंख्येने होते. त्यांनी उत्तम व्यवस्था ठेवली होती. मंदिराच्या अर्धा कि.मी. अलीकडे आम्हाला आमच्या चपला, बूट ठेवावे लागले. त्याचप्रमाणे प्रत्येकाला आपापले मोबाइल जमा करावे लागले. त्यानंतर आम्ही मंदिर प्रवेशाच्या रांगांमध्ये उभे राहिलो. स्त्री आणि पुरुष यांच्या वेगवेगळ्या ४-५ रांगा. जवळजवळ एक कि. मी. रांगा होत्या. रांगांच्या लोंढ्यातून मंदिरात पोहोचायला एक तास लागला; पण आत गेल्यावर श्रमपरिहार होऊन अवर्णनीय आनंद मिळाला.
आतील मंडप एवढा भव्यदिव्य आणि विलोभनीय आहे की नजर हटतच नव्हती. आमच्या रांगांच्या गर्दीचा लोंढा पुढे सरकत होता. मला वाटत होते की गाभाऱ्याच्या द्वारापर्यंत जाऊन मनसोक्त दर्शन घेता यईल; पण आमच्या रांगा गाभाऱ्याच्या पाचशे मि. पर्यंत अडविण्यात आल्या. त्यामुळे आम्हाला सं. तुलसीदासांप्रमाणे रामलल्लाच्या ओझरत्या दर्शनावरच समाधान मानावे लागले; पण त्या दर्शनातच प्रत्यक्ष ब्रह्मानंदाचा अनुभव आला. मूर्ती एवढी सुंदर आहे की पाहतच राहावे असे वाटते. आमच्या रांगा ताबडतोब डाव्या बाजूने वळवल्या आणि आम्ही बाहेर पडलो.
केवळ राममंदिरच सुंदर आहे असं नाही, तर अयोध्यानगरीच सुंदररीत्या पुनर्स्थापित केली आहे. आम्ही तेथून नगर दर्शनाला गेलो. रुंद दुपदरी रस्त्याच्या दुतर्फा व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली होती. आम्ही पेढे व इतर मिठाई घेतली. पुढे एका चौकात आलो आणि अहो आश्चर्यम् चौकावर मोठा बोर्ड दिसला. लता मंगेशकर चौक, विशाल आकाराचा, वीणा या वाद्याचा पुतळा केला होता आणि तो चौकात सुंदर बेट करून त्यावर ठेवला होता.
तिथून आम्ही शरयू नदीच्या सुंदर घाटावर आलो. नदीच्या दुतर्फा घाटांचे काम फार सुंदर आणि आखीव केले आहे. दोन्ही तटांवर जाण्यासाठी मध्ये पूल बांधलेले आहेत. दोन्ही तटांवर विक्रेत्यांनी पूजा साहित्य, जपमाळा, शंख यांची दुकाने थाटली आहेत. आम्ही शरयू नदीचे पवित्र जल घेऊन निवासस्थानी परतलो. निवासस्थानाचे तंबूही बादशाही थाटाचे होते.
आतील व्यवस्था अतिशय आरामदायी होती. तिथे आम्ही नाश्ता आणि दुपारचे जेवण करून विश्रांती घेतली. त्यानंतर परत शरयू घाटावर जाऊन संध्याकाळच्या नदीच्या आरतीत भाग घेतला. तेथेच रामायणावर आधारित लेसर शो बघितला. आरतीचा प्रसाद घेतला आणि मुक्कामाला परतलो, सकाळी सहा वाजता रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या आराम बस होत्या. त्यांनी स्टेशनवर आलो. आठ वाजता परत गोव्याला जाणारी बस होती. आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. परत अडीच दिवस गाडीत गमतीजमती करत घरी परतलो. अयोध्या दर्शन प्रवास भौतिक आणि आध्यात्मिक आनंदाचा झाला.