लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: नावेली जंक्शनजवळ मंगळवारी सकाळी मुलीला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी जात असणाऱ्या आईवर काळाने घाला घातला. ऑडिलिया सिल्वा (५९) असे मृत महिलेचे नाव आहे. तर मुलगी ऑडिलीया सिल्वा लथिशा (२२) ही जखमी झाली असून तिला उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नावेली परिसरात सकाळपासूनच वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. सालझोरा येथून ऑडिलया आपल्या दुचाकीवरून मुलगी लथिशा हिला रोझरी कॉलेजमध्ये सोडण्यासाठी निघाल्या होत्या. नावेली येथील उडपी हॉटेलसमोर पावसामुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्या कोंडीतच या दोघी मायलेकी अडकल्या होत्या. काही वेळात समोरील वाहने पुढे गेल्याने ऑडिलीया यांनीही आपली दुचाकी पुढे घेतली असता वाऱ्यामुळे झाडी फांदी थेट त्यांच्या डोक्यावर पडली.
ऑडिलीया यांनी हेल्मेट घातले असतानाही डोक्याला गंभीर दुखापती झाली. तर मागे बसलेली लथिशा हिला दुखापत झाली. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिकेशी संपर्क केला. मात्र, वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला घटनास्थळी पोहोचण्यास उशिर झाला. त्याचवेळी नावेली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ऑडिलीया यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर मुलगी लथिशा हिला इस्पितळात दाखल केले. ऑडिलीया मुलगी व सासू सोबत सालझोरा येथे राहात होत्या. त्यांचे पती आखातात नोकरीला आहेत. या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
या घटनेला वन खाते, दक्षिण गोवा जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम खाते कारणीभूत आहे. वेळोवेळी लक्ष देऊन रस्त्याच्या बाजूला असलेली धोकादायक झाडे हटवणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज एका मातेचा बळी गेल्याचा आरोप करत संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रीन गोवा फाऊंडेशनचे अध्यक्ष रेझन आल्मेदा यांनी केली आहे.
स्वयं अपघातात युवक ठार
सोमवारी रात्री नावेली चर्चच्या मागे सेंट्रल बँकेजवळ झालेल्या स्वयं अपघातात खारेबांध येथील दुचाकीचालक दिप्तेश दामोदर दळवी (३५) याचा मृत्यू झाला. हा अपघात रात्री ११ च्या सुमारास घडला. मडगाव पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. मंगळवारी पाजीफोड येथील हिंदू स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी व दोन भाऊ असा परिवार आहे.
धोकादायक झाड कापण्याची सूचना
घटनेनंतर उपजिल्हाधिकायांना संबंधित त झाड हटविण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आश्वीन चंद्र ए यांनी दिली. खासगी मालकीच्या जमिनीतील झाडे कापता येत नाहीत. त्यासाठी आवश्यक प्रक्रीया करणे गरजेचे असते, असे ते म्हणाले. धोकादायक झाडे शोधून काढण्यासाठी सांगण्यात आल्याचे ते म्हणाले.