मडगाव - गोवेकरांना ज्या पावाशिवाय सकाळचा चहा जात नाही तोच पाव आता 10 ऑक्टोबरपासून 5 रुपयाने विकत घेण्याची पाळी गोमंतकीयांवर येणार आहे. गोव्यातील स्लाईस ब्रेडची किंमत यापुर्वीच चार रुपयांनी वाढली आहे. त्यात आता पावही एका रुपयाने वाढणार आहे.
मैदय़ाच्या पिठाच्या आणि अन्य वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढल्याने आम्हाला नाईलाजाने पावाची किंमत वाढवावी लागते असे अखिल गोवा बेकर्स संघटनेचे अध्यक्ष पीटर फर्नाडिस यांनी बुधवारी स्पष्ट केले. पावाची किंमत नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी गोवा सरकारने आम्हाला काही सवलती द्याव्यात अशी मागणी आम्ही केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने आता हा दरवाढीचा निर्णय आम्हाला घेणो भाग पडले आहे. तरीही आम्ही 10 ऑक्टोबरपर्यंत सरकारला मुदत देतो असे ते म्हणाले.
गोव्यात बेकरीचा धंदा हा पारंपारिक असून सुमारे 600 उद्योजक अजुनही या धंद्यात आहेत. मात्र वाढत्या महागाईत हा धंदा करणे परवडत नसल्यामुळे एक तर गोवेकर तो सोडून देऊ लागले आहेत किंवा आपल्या पावाच्या भट्टय़ा बिगर गोमंतकीयांना चालवायला देऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत गोव्यातील हा पारंपारिक व्यवसाय नामशेष तर होणार नाही ना अशी शंका येऊ लागली आहे.
मंगळवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना फर्नाडिस यांनी बेकरीवाल्यांच्या अडचणीकडे सरकार लक्ष देत नाही. दुसऱ्या बाजूने पिठाच्या आणि लाकडाच्या किंमती वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत चार रुपयाने पाव विकणे आम्हाला परवडत नाही. बेकरीवाल्यांना जर दिलासा द्यायचा असेल तर सरकारने या उद्योगासाठी खास योजना जारी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बेकरी व्यवसाय हा पारंपारिक व्यवसाय असल्याने त्यावरील जीएसटी कमी करावा अशी मागणी यापूर्वी आमच्या संघटनेने केली होती. मात्र त्याकडे अजुनही लक्ष दिलेले नाही. सध्या हा व्यवसाय परवडत नसल्यामुळे कित्येकजण हा धंदा सोडू लागले आहेत. या व्यवसायाला संरक्षण देण्यासाठी सरकारने सवलती द्याव्यात अशी मागणी आम्ही केली होती. मात्र त्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. सरकारने काही सवलती दिल्यास पावाची किंमत नियंत्रणाखाली राहू शकते असेही ते म्हणाले. यासाठी आम्ही सरकारला 10 ऑक्टोबरपर्यंत मुदत देत आहोत असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्याबरोबर संघटनेचे सचिव एल्वीस फर्नाडिस तसेच दक्षिण गोव्याचे संघटनेचे उपाध्यक्ष शेखर सावर्डेकर उपस्थित होते.