पणजी: वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणारी वाहने आपोआप टिपली जाणारी स्वयंचलित यंत्रणा बसविण्याचा प्रकल्प गोवा पोलिसांच्या विचाराधीन आहे. त्यासाठी प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. वाहतूक सिग्नलच्या संकेताची उल्लंघने टिपण्यासाठी सिग्नलच्या ठिकाणी पोलीस ठेवावे लागणार नाही. उल्लंघने टिपणारी म्हणजे लाल दिवा लागला असताही न थांबणारे कॅमऱ्यातच टिपले जातील, अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी पोलीस खाते प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी म्हटले आहे.राज्यात अनेक ठिकाणी स्वयंचलित सिग्नलची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यत: महामार्गावर अनेक ठिकाणी ती कार्यरत करण्यात आली आहे. सिग्नलचे संकेत पाळले जात आहेत, उल्लंघनाचे प्रकारही किरकोळपणे घडत आहेत. परंतु काही ठिकाणी विशेषत: पर्वरी ओ कोकेरो सारख्या ठिकाणी अनेक लोक संकेत पाळत नसल्याच्या तक्रारी पोलीस महासंचालकांना आल्या आहेत. त्यामुळे स्वयंचलित सिग्नलबरोबरच उल्लंघने टिपणारी स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करण्याचा पोलीस खात्याचा प्रयत्न आहे. दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-याविरुद्ध सुरू केलेली मोहीम चालूच ठेवली जाणार असल्याचे महासंचालकांनी म्हटले आहे.
गोव्यात सिग्नल तोडणारे आपोआप टिपले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 6:58 PM