पणजी: केरी पॅराग्लायडिंग लाच प्रकरणात लाचखोरीचे धागेदोरे हे पोलीस हवालदारापासून निरीक्षकापर्यंत पोहोचल्याचे उघडकीस आले आहे. भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून (एसीबी) तेरेखोल किनारी पोलीस स्थानकाचे तत्कालिन निरीक्षक विद्धेश पिळगावकर याला या प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणी एसीबीकडून यापूर्वी हवालदार संजय तळकर आणि उदयराज उर्फ राजू कळंगुटकर या दोघांना अटक केली होती.
केरी समुद्रकिनारी परिसरात पॅराग्लायडिंग व्यवसाय करतात. हा व्यवसाय करण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक परवाना नसल्याचा दावा करून पेराग्लायडिंग व्यवसाय चालू ठेवण्यासाठी हवालदार संजय तळकर याने आपल्याकडे लाच मागितल्याची तक्रार पृथ्वी एच. एन. यांनी एसीबीकडे केली होती. दर महिना १० हजार रुपये लाच मागितल्याचे त्यांनी सादर केलेल्या तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणात एसीबीने गुन्हा नोंदवून घेऊन या अगोदर हवालदार संजय तळकर आणि उदयराज यांना अटक केली होती. चौकशीअंती या प्रकरणात निरीक्षक विद्वेश पिळगांवकर याचाही सहभाग असल्याचे एसीबीला आढळून आले. त्यामुळे एसीबीकडून त्याला अटक करण्यात आली अशी माहिती एसीबच्या सूत्रांकडून देण्यात आली.
या प्रकरणात तक्रारदाराने बरेच पुरावे एसीबीला सादर केले होते. लाचेची रक्कम जी १० हजार रुपये प्रतिमहिना इतकी मागितली होती ती नंतर ८ हजार देण्यावर अधिकारी राजी झाले होते. मुख्य म्हणजे रक्कम ऑनलाईन फेडण्यात आली होती, ज्यामुळे या व्यवहारांचे पुरावे तक्रारदाराकडे उपलब्ध आहेत.
ह्या प्रकरणात तक्रारदारालाच खोटे ठरविण्याचा खटाटोप करताना संशयितांनी तक्रारदाराविरुद्ध गुन्हाही नोंदविला होता. तसेच त्याचे पॅराग्लायडींग साहित्य जप्तही केले होते. दरम्यान, २२ मार्च रोजी संशयित पोलिसांनी तक्रारदाराच्या विरोधात खोटे आरोप करून गुन्हा दाखल केला. त्याचे पॅराग्लायडिंग साहित्य जप्त केले. पण कोणतेही पुरावे नसताना केलेली ही कारवाई संशयितांच्या अंगलट आली होती. तक्रारदाराने पुराव्यासह एसीबीकडे तक्रार नोंदविल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. या प्रकरणानंतर पोलीस खात्याने पोलीस निरीक्षक विद्धेश पिळगावकर यांनी तत्काळ जीआरपीमध्ये बदली केली होती.