ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 27 - येत्या 14 ऑक्टोबरपासून तीन दिवस दक्षिण गोव्यात होणा-या ब्रिक्स परिषदेसाठीच्या तयारीचा तपशीलवार आढावा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी घेतला. एकूण साठ कोटी रुपये खर्चून रस्ता दुरुस्ती व रुंदीकरण ब्रिक्स परिषदेपूर्वी केले जाणार आहे. तसेच 173 वाहनांचा वापर केला जाणार आहे. एकूण एकसष्ट टॉवर्स दक्षिण गोव्यात उभे केले जातील.ब्रिक्स परिषदेच्या तयारीसाठी सरकारने खास सचिवालयाची स्थापना केली आहे. या सचिवालयाची पहिली बैठक मंगळवारी पार पडली. मुख्यमंत्री पार्सेकर हे या सचिवालयाचे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे उपाध्यक्ष आहेत. डिसोझा यांच्यासह मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी व साधनसुविधा विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांनी बैठकीत भाग घेतला. उपमुख्यमंत्री डिसोझा यांनी बैठकीनंतर लोकमतला सांगितले, की ब्रिक्स परिषदेवेळी वेर्णा ते दाबोळी विमानतळापर्यंत मार्गावर सौंदर्यीकरण केले जाईल. 44 किलोमीटर लांबीचे रस्ते दुरुस्त केले जातील. चाळीस बसगाडय़ांसह एकूण 173 वाहने परिषदेवेळी वापरली जाईल. खूप मोठय़ा प्रमाणात सुरक्षा व्यवस्थेचा वापर केला जाणार आहे. कारण हजारभर महनीय व्यक्ती या परिषदेस येणार आहेत. अनेक राष्ट्रांचे प्रमुख सहभागी होतील. त्यांच्या सुरक्षेसाठी जास्त मनुष्यबळ वापरावे लागेल.डिसोझा यांनी सांगितले, की दक्षिण गोव्यात ब्रिक्स परिषदेसाठी एकूण 61 टॉवर्स उभे केले जातील. त्यापैकी 45 टॉवर्स आतार्पयत सरकारी जागेत उभे करण्यात आले आहेत. साधनसुविधा विकास महामंडळाकडूनही ब्रिक्स परिषदेनिमित्त काही कामे केली जाणार आहेत.
ब्रिक्ससाठी साठ कोटींचे रस्ते, 173 वाहने, 61 टॉवर्स
By admin | Published: September 27, 2016 9:09 PM