पणजी : आॅक्टोबरमध्ये गोव्यात होऊ घातलेल्या आठव्या ब्रिक्स परिषदेचे स्थळ केंद्र सरकारने बदलून ते मध्य प्रदेशातील खजुराहो येथे घेण्याचे निश्चित केल्याची माहिती हाती आली आहे. येथील पर्यटन व्यवसायाला हा फार मोठा फटका मानला जात आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या राष्ट्रांची ही आंतरराष्ट्रीय परिषद गोव्यात व्हावी यासाठी दिल्लीत लॉबिंग करण्यास गोव्याचे नेते कमी पडले, हे यातून स्पष्ट होत आहे. केंद्रात संरक्षणमंत्री असलेले मनोहर पर्रीकर यांचे प्रयत्नही कमी पडले की काय, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. ही आंतरराष्ट्रीय परिषद गोव्यातील मोठा इव्हेंट ठरला असता. उपरोक्त देशांचे आठ हजारांहून अधिक प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. या परिषदेमुळे राज्यातील पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्यासही मदत होणार होती. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही ही परिषद गोव्यासाठी मोठे वरदान ठरणार असल्याचे भाष्य केले होते. १५ आॅक्टोबरला या परिषदेचे उद्घाटन होणार होते. स्वराज यांचा निर्णय?केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी ब्रिक्स परिषद खजुराहो येथे नेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या मतदारसंघापासून हा भाग जवळच आहे. पंतप्रधान कार्यालयाने परिषद स्थळ बदलण्याचा निर्णय घेत २२ ते २३ जून दरम्यान घेतला. खजुराहो येथे ३१ आॅगस्ट आणि १ सप्टेंबर अशी दोन दिवस परिषद घेण्याचे केंद्र सरकारने ठरवल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
ब्रिक्स परिषद खजुराहोमध्ये?; स्थळ बदलल्याने गोव्याला ठेंगा
By admin | Published: June 28, 2016 3:39 AM