लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली: लईराई देवीच्या धोंड व भाविकांसंदर्भात भावना दुखावणारी टिप्पणी केल्याप्रकरणी देवीचे भक्त काल पुन्हा संतप्त झाले. श्रेया धारगळकर हिला त्वरित डिचोली पोलीस ठाण्यात हजर करा, अशा आग्रही मागणी करत शेकडो भाविकांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली. त्यानंतर हमरस्त्यावर बसून दोन तास वाहतूक रोखून धरली.
रात्री ११.३० वाजता आमदार प्रेमेंद्र शेट व पोलिसांनी लोकांशी चर्चा करून धारगळकर हिला तडीपार करण्याच्या कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर, निरीक्षक राहुल नाईक यांनी संतप्त भाविकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोक आपल्या भूमिकेवर कायम राहिल्याने बराच वेळ तणाव निर्माण झाला.
सागर एकोस्कर यांनी भाविकांसमोर पोलिसांची भूनिका स्पष्ट केली. श्रेया धारगळकर हिला डिचोली पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून तिला न्यायालय कोठडी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे तिला डिचोली पोलीस ठाण्यात आणणे शक्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी कायद्यातील तरतुदींही स्पष्ट करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला मात्र संतप्त भाविक कोणत्याही परिस्थितीत तिला महिलेस डिचोली पोलिस ठाण्यात दाखल करण्याची मागणी ठाम राहून रस्त्यावरील ठिय्या हटविण्यास नकार दिला.
देवीचे धोंड व भक्तांसंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने दोन दिवसांपूर्वी शेकडो भाविक डिचोली पोलीस ठाण्यावर जमले होते व त्यांनी सादर महिलेस त्वरित अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी या पूर्वीच तिला अटक केली केली होती. बुधवारी धारगळर हिला ताब्यात घेऊन पोलिसांनी आवश्यक सोपस्कार केले. त्यानंतर न्यायालयीन कोठडी घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र काल भाविकांनी श्रेयाला डिचोली पोलीस ठाण्यातच आणा, असा आग्रह धरल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
रात्री उशिरा बैठक....
रात्री उशिरा उत्तर गोवा पोलीस उपअधीक्षक जीवबा दवळी यांच्या उपस्थितीत आमदार प्रेमेंद्र शेट व लईराई देवच्या भक्तांचे पाच जणांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. यावेळी दळवी यांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आम्ही कारवाई करत धारगळकर हिला न्यायालयीन कोठडी घेतल्याचे सांगितले, पोलिसांनी शिष्टमंडळाला कायदेशीर सोपोस्काराबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर संबंधित शिष्टमंडळाने याबाबत स्थानकाबाहेर जमलेल्या लोकांसोबत चर्चा केली. त्यानंतर जमाव शांत झाला.
बगलमार्गावरही 'कोंडी'
पोलिस अधिकारी वारंवार लोकांची समजूत काढत होते. मात्र देवीच्या संदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे आम्ही ते खपवून घेणार नसल्याचे सांगत भाविक प्रचंड आक्रमक झाले होते. रात्री साडेदहा वाजेपर्यंत लोक मागणीवर ठाम राहून डिंचोली स्थानकावर जमले होते. संतप्त भाविकांनी डिचोली-साखळी मार्ग तसेच नवीन बगल रस्ताही रोखून ठेवल्याने परिस्थिती तणाव पूर्ण होती.