लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने गोव्याला आत्मनिर्भर बनवेल, असा विश्वास पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. विद्यार्थी, पर्यटन, व्यावसायिक, तसेच सर्वसामान्य जनता असे प्रत्येक घटक, तसेच उद्योगाला काहीतरी देण्याचा प्रयत्न यात केला आहे. याचा फायदा राज्याला भविष्यात बराच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्री खवटे म्हणाले की, मुख्यमंत्री मेडिक्लेम योजनेंतर्गत मेडिक्लेमची मर्यादा दीड लाखावरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेमुळे जनतेला आरोग्य सुविधांच्या दृष्टीने मोठा फायदा होईल. याशिवाय या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न मर्यादाही ५ लाखांवरून ८ लाख रुपये केली आहे. याशिवाय दीनदयाळ स्वास्थसेवा योजनेचे पुनरावलोकन केले जाईल. आयटी खात्यांतर्गत हर घर फायबर जोडण्यावर भर दिला जाणार आहे, तसेच स्टार्टअपलाही अर्थसंकल्पाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
'प्रशासन स्तंभ' ही सर्व सरकारी खात्यांच्या कार्यालयांचा समावेश असलेली सर्वात मोठी इमारत पणजीत उभारली जाणार आहे. याशिवाय अबकारी करात कपात, हिंटरलैंड पर्यटनावर भर, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम, आरोग्य, कृषी, पशुपालन, वाहतूक आदी सर्वच क्षेत्रांत सरकारने या अर्थसंकल्पात बऱ्यापैकी तरतूद केली आहे. एकूणच गोव्याच्या विकासाला यामुळे बळ मिळेल, असे मंत्री खवटे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"