पणजी : राज्यातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानांसाठी एक किलोमीटरचा बफर झोन लागू करण्यावर केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने शिक्कामोर्तब केले आहे. फक्त चोडण पक्षी अभयारण्यासाठी चोडण गावच्या बाजूने १०० मीटरचा बफर झोन लागू होणार आहे. येत्या अवघ्याच दिवसांत याबाबतची अधिसूचना जारी होणार असल्याची माहिती मिळाली. बफर झोन जाहीर करण्यासाठी दि. २१ आॅक्टोबरपर्यंत केंद्रीय वन मंत्रालयाला मुदत आहे व त्यामुळे मंत्रालयाने अजून अंतिम अधिसूचना जारी केलेली नाही. एक किलोमीटर बफर झोन ठेवण्यावर मंत्रालयाने शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, हा विषय सर्वोच्च न्यायालयात असल्याने मंत्रालयाच्या अधिसूचनेनंतर न्यायालयाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. वन व पर्यावरण मंत्रालयाने एक किलोमीटर बफर झोनवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती येथील वन खात्याच्या सूत्रांकडून मिळाली. येत्या आठवड्यात वन मंत्रालय या निर्णयाची माहिती सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्याची शक्यता आहे. बफर झोनमध्ये २३ खनिज खाणी आहेत. या खाणी तत्काळ बंद करण्याचे आदेश द्यावेत की त्या टप्प्याटप्प्याने बंद कराव्यात याचा निर्णय मंत्रालय घेऊ शकलेले नाही. या खाणी दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने बंद करण्यास मंत्रालयाने मान्यता द्यावी, अशी विनंती गोवा सरकारने केली आहे. मात्र, विषय न्यायालयात असल्याने मंत्रालयाचेही अडले आहे. चोडण पक्षी अभयारण्याच्या तिन्ही बाजूंनी मांडवी नदी आहे. नदी हाच बफर झोन असल्याचे वन मंत्रालयाने मान्य केले आहे; पण चौथ्या बाजूला चोडण गाव असून तिथे १०० मीटरचा बफर झोन लागू करण्याचा निर्णय झाला आहे, असे सूत्रांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)
बफर झोन १ किमीचाच
By admin | Published: September 19, 2014 1:41 AM