वास्को : मंगळवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान ७ दरोडेखोरांनी रंघवी इस्टेट येथील बंगल्यात राहणाऱ्या एका नवविवाहित जोडप्याच्या फ्लॅटमध्ये घुसून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर वस्तू मिळून ६ लाखांचा ऐवज लंपास केला. याबाबत वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रंघवी इस्टेट-बोगमाळो येथील एका बंगल्याच्या वरच्या मजल्यावर नौदलाचे वैमानिक अभियंते अवधेश शर्मा आणि त्यांची पत्नी राहतात़ तळमजल्यावर बंगल्याचे मालक अल्ताफ शेख यांचे कुटुंब राहते़ हे कुटुंबीय मंगळवारी सकाळी त्यांच्या नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी गेले होते़ अज्ञात चोरांनी वरच्या मजल्यावरील एका खोलीचे ग्रील काढून फ्लॅटमध्ये प्रवेश केला़ त्या वेळी अवधेश शर्मा व त्यांची पत्नी फ्लॅटमध्ये होती़ हे नवदाम्पत्य असून चार दिवसांपूर्वीच ते विवाहबद्ध होऊन या फ्लॅटमध्ये राहण्यास आले होते़ नवदाम्पत्य असल्याने अवधेश शर्मा यांच्या पत्नीच्या अंगावर सर्व सुवर्णालंकार होते़ चोरांनी फ्लॅटमध्ये प्रवेश करताना आपले तोंड स्कार्फ ने झाकले होते़ फ्लॅटमध्ये शिरल्यानंतर चोरांनी पती-पत्नीला धरून ठेवले़ एका चोराने पत्नीचा गळा आवळून तिला मारण्याचा प्रयत्न केला असता, तिने ‘आमच्याजवळ जे जे आहे, ते न्या; परंतु मारू नका,’ अशी विनवणी केल्यावर दरोडेखोरांनी पती-पत्नीचे पाय पलंगाला बांधले व त्यांच्या अंगावरील सर्व दागिने तसेच घरातील रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या़ जाताना याची वाच्यता न करण्याची धमकी देऊन तसेच बाहेरच्या खोलीला कडी घालून पसार झाले़ दरोडेखोरांनी तळमजल्यावरील बंगल्याचे मालक अल्ताफ शेख यांच्या घरातही चोरी करून घरातील दोन सोनसाखळ्या व दोन अंगठ्या मिळून ६० हजार रुपयांचे दागिने पळविले़ या दरोडेखोरांनी जाताना इतर शेजारी घराबाहेर धावून येऊ नयेत, यासाठी तीन-चार घरांना बाहेरून कडी लावली आणि पसार झाले़ काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारच्या दोन-तीन चोऱ्या झाल्याने या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़ (प्रतिनिधी)
बोगमाळोत दरोडा; ६ लाखांचा ऐवज लंपास
By admin | Published: December 28, 2016 1:13 AM