वास्को: मांगोरहील, वास्को येथील सेंट तेरेसा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कमीसहीत १ लाख ३० हजाराची मालमत्ता लंपास केली. अज्ञात चोरट्यांनी विद्यालयाच्या प्रशासकीय कार्यालय इमारतीच्या दरवाजाचे टाळे फोडून आत प्रवेश करून चोरी केल्याचे पोलीसांना तपासणीत उघड झाले.
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी (दि.२) दुपारी २.३० ते सोमवारी (दि.४) सकाळी ७.३० ह्या वेळेच्या दरम्यान तो चोरीचा प्रकार घडला. शनिवारी विद्यालय बंद झाल्यानंतर सोमवारी उघडले असता विद्यालयाच्या मुख्याध्यापक कार्यालयात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात चोरट्यांनी टाळे तोडून मुख्याध्यापक कार्यालयात प्रवेश केल्यानंतर तेथे असलेली १ लाखाची रोख रक्कम आणि ३० हजार कींमतीचे ४ डीव्हीआर घेऊन घटनास्थळावरून पोबारा काढला.
चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सोमवारी सकाळी सेंट तेरेसा उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने वास्को पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. पोलीसांना चोरीची माहीती मिळताच त्यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. वास्को पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादस ४५४, ४५७ आणि ३८० कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन नागेशकर अधिक तपास करीत आहे.