मडगाव : गोव्यातील बाळ्ळी येथे एका वळणावर रस्त्याकडेला कुंकळ्ळी परिसरातील एका हायस्कूलची विद्यार्थी वाहतूक करणारी बस, बालरथ उलटून अपघात झाला. या अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले. गुरुवारी सकाळी ही बस विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे निघाली होती. बसमध्ये ३४ विद्यार्थी होते. जखमींना तातडीने स्थानिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बाळ्ळी आरोग्य केंद्राजवळ सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. एका हायस्कूलला विद्यार्थी नेताना वळणावर बालरथ बस चालकाचा ताबा सुटला. वळणावर गाडी रस्त्याकडेला उलटली. त्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून विद्यार्थ्यांना बाहेर काढले. बसमध्ये ३४ विद्यार्थी होते. त्यापैकी चौघे जखमी झाले. त्यांना बाळ्ळी आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी या अपघाताची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली. कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी अपघाताची माहिती घेतली. बसवर चालकाचा ताबा नेमका कशामुळे सुटला, याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात डोक्याला मार लागलेल्या दोन विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.