पणजी - कदंब महामंडळाने मोठा गाजावाजा करुन रस्त्यावर आणलेल्या स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीच्या तीनपैकी बायोगॅसवर चालणारी एक बस विनावापर पडून आहेत. गेल्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी बायोगॅसवर चालणारी एक आणि बायो इथॅनॉलवर चालणाऱ्या दोन बसगाड्यांचा शुभारंभ केला होता. बायोगॅसवर चालणारी बस कदंबच्या पर्वरी आगारात पडून आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशामक दलाकडून सुरक्षाविषयक दाखला न मिळाल्याने ही बस बंद आहे. महामंडळाने बायोगॅस प्रकल्पासाठी कंपनीला जागा दिलेली आहे परंतु स्वीडनच्या या कंपनीने ज्या संस्थेशी हातमिळवणी केली आहे. त्या संस्थेने परवान्यासाठी आवश्यक ते दस्तऐवज अग्निशमक दलाला सादर केलेले नाहीत. बस बंद असल्याने इंजिन खराब होऊ नये याकरिता रोज ही बस काही वेळ चालू करुन नंतर बंद केली जाते.
इथेनॉलवर चालणाऱ्या अन्य दोन बसगाड्या मात्र पणजी-मडगांव आणि पणजी-वास्को शटल सेवेसाठी तैनात करण्यात आल्या परंतु यातील पणजी-वास्को मार्गावरील बसची एसी गेला महिनाभर बंद आहे. तांत्रिकी कारणामुळे एसी बंद असल्याचे सांगण्यात येते. पणजी-मडगांव मार्गावरील बसमधील एसीबाबतही प्रवाशांच्या तक्रारी आहेत. लोक या बसगाड्यांमधून म्हणूनच प्रवास टाळत आहेत. या बसगाड्यांची बांधणीच अशी आहे की खिडक्या उघडता येत नाहीत. पूर्ण काचेचे आच्छादन असल्याने एसीची गरज भासते.सुत्रांनी दिलेल्या अन्य माहितीनुसार या बसगाड्या दिवशी १८0 ते १८५ किलोमीटर इतकेच अंतर धावत आहेत. कदंब महामंडळाच्या इतर बसगाड्या दिवशी ३00 किलोमीटर धावतात. गोव्यातील रस्ते अरुंद असल्याने या मोठ्या बसगाड्यांसाठी तीही एक समस्या आहे.स्कॅनिया कंपनीच्या या बसगाड्या प्रायोगिक तत्त्वावर कदंब महामंडळाने घेतल्या होत्या. प्रयोग यशस्वी झाल्यास आणखी ५0 गाड्या खरेदी केल्या जाणार होत्या. सध्या या बसगाड्यांना लागणारे इथेनॉल नागपूरहून आणले जाते. प्रवासखर्च परवडत नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार २0 रुपये लिटर दर अपेक्षित होता परंतु वाहतूक खर्च वाढल्याने हे इंधन ५0 ते ५५ रुपये प्रति लिटर पडते. प्रती लिटर १.१ किलोमिटर मायलेज या बसगाड्या देतात. तूर्त इथेनॉल इंधनाचा व चालकाचा खर्च कंपनी उचलत आहेत, कदंबचा वाहकच तेवढा या बसगाड्यांवर असतो.
अशी आहे व्यवस्थापूर्णपणे वातानुकुलीत असलेली ही बस ३७ आसनी असून इंजिन मागील बाजूस आहे. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आणि जीपीएस सिस्टम असल्याने बस नेमकी कुठे आहे हे ट्रॅक केले जाऊ शकते. या बसचे खास वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांगांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये चढण्या-उतरण्यासाठी सोयीचे व्हावे याकरिता अशी व्यवस्था आहे की बसचे फ्लोरिंग खाली घेता येते. गतिरोधक आला किंवा रस्त्यावर पावसाचे पाणी साचलेले असल्यास फ्लोरिंग एक फूट वर घेता येते.
केवळ प्रयोगासाठी : कार्लुस आल्मेदाकदंब महामंडळाचे अध्यक्ष आमदार कार्लुस आल्मेदा यांनी दिलेल्या माहितीनुसार या बसगाड्या केवळ प्रयोगासाठी आणल्या होत्या. त्यांच्या कार्यक्षमतेचा आढावा अजून घ्यायचा आहे. या बसगाड्या पुढे चालू ठेवाव्यात की नाही हे आढावा घेतल्यानंतरच ठरविले जाईल. याच कंपनीच्या बायो इथॅनॉलवर चालणाºया बसेस सध्या नागपूर महापालिकेच्या ताफ्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. बायोगॅसचा इंधन म्हणून वापर होत असल्याने या बसगाड्या प्रवाशांचा किती भार वाहू शकतात, इंजिन गरम होते का या सर्व गोष्टी तपासाव्या लागतील.