पणजी: पावसाळा जवळ आल्याने सध्या बाजारांमध्ये पावसाळी साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसत आहे. या प्लास्टीकपासूनच्या पिशव्या, छत्री, रेनकॉट, पावसाळी चप्पल तसेच इतर पावसाळी साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहे. राज्यातील सर्व बाजारामध्ये हे साहित्य विक्रिस आलेले आहे.
शनिवारी पणजी मार्केटमध्ये ग्राहकांनी विविध पावसाळी साहित्य खरेदी केली होती. आता मान्सूनपूर्व पाऊस सुुरु झाला आहे. जून महिन्यापासून मान्सून पावसाला सुरवात होणार आहे. त्यामुळे लोकांनी आतापासून साहित्य खरेदी केले आहे. त्यामुळे दुकानावर हे साहित्य माेठ्या प्रमाणात विक्रीस आले आहे.
रेनकोट छत्र्यांची खरेदी
सध्या पावसाळा सुरु झाला असल्याने रेनकोट छत्र्यांना मागणी वाढली आहे. बाजारामध्ये विविध आकर्षक असे रेनकोट दाखल झाले आहेत. पुरुष, महिला तसेच लहान मुलांसाठी विविध आकाराचे रेनकोट बाजारात विक्रिस आहेत. ते ५०० पासून १५०० हजार पर्यंत विकले जात आहेत. तसेच छत्र्याही विविध प्रकारच्या आलेल्या आहेत. छत्री १५० ते ३०० रुपये विकली जात आहे. यात महिलांसाठी आकर्षक अशा छत्र्या आलेल्या आहेत.तसेच सध्या पावसाच्या पाण्याच्या बचावासाठी वापरली जाणारी प्लास्टिक पिशवी खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. बाजारात पिशवी ३० रुपये मीटरनेही विकली जात आहे. लाेक आपल्या परसघरात तसेच गाड्या पावसाळ्यात भिजू नये यासाठी असे प्लास्टिक पिशव्या खरेदी करत आहेत.
शालेय साहित्यांचीही खरेदी
आता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शाळा सुरु होणार असल्याने अनेक पालक आपल्या मुलांना बाजारात घेऊन शालेय साहित्य खरेदी करत आहेत. मुलांना नवीन बॅग, वह्या, कपडे, तसेच इतर साहित्य खरेदी केले जात आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यात लागणारे इतर खाद्य साहित्य खरेदी केेले जात आहे.