पणजी : मांडवी नदीत सध्या जेसहा कॅसिनो आहेत, त्यांना आणखी सहा महिने म्हणजे दि. 30 सप्टेंबपर्यंत मांडवी नदीत राहण्यास सरकारने मुदतवाढ दिली आहे. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याविषयीचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. मांडवीतील कॅसिनोंना अन्यत्र हलविले जाईल, असे सरकार गेली काही वर्षे जाहीर करत आहे व दुसऱ्या बाजूने कॅसिनोंना मांडवीत राहण्यासही मुदतवाढ देत आहे. आता दि. 1 एप्रिल 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी कॅसिनोंना मांडवीत मुदतवाढ दिली गेली.
या कॅसिनोंचे स्थलांतर करण्यासाठी गृह खाते व बंदर कप्तान खात्याने मिळून चार जागांची पाहणी केली होती. पहिली जागा मांडवी नदीच्या मुखावर आग्वाद तुरुंगाच्या जवळ पाहिली गेली होती. जुवारी नदीत पुलाच्या पूव्रेस व पश्चिमेच्या बाजूने तसेच शापोरा नदीतील ठिकाण अशा चार जागा सरकारने विचारात घेतल्या होत्या. तिथे हे कॅसिनो न्यावेत, असे सरकारला वाटत होते पण पुढे काही घडले नाही.
काही कॅसिनोंच्या परवान्यांची मुदत 2023 साली संपुष्टात येणार आहे. रॉयल फ्लोटेलची मुदत जून 2021 मध्ये संपुष्टात येणार आहे. हॉर्स शू कॅसिनोच्या परवान्याची मुदत 2018 साली संपली, आता परवाना नूतनीकरण प्रक्रिया सुरू आहे.