- सदगुरू पाटीलपणजी : बाबू कवळेकर, मायकल लोबो, जेनिफर मोन्सेरात आणि फिलीप नेरी रॉड्रीग्ज या चार नव्या मंत्र्यांचा शपथविधी शनिवारी पार पडला. नवे उपमुख्यमंत्री म्हणून कवळेकर यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी विजय सरदेसाई, रोहन खंवटे, जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर या चार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देणारा आदेश जारी केला.राजभवनवर शनिवारी सायंकाळी शपथविधी सोहळा पार पडला. कवळेकर, लोबो आणि जेनिफर या तिघांना आयुष्यात प्रथमच मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रीग्ज हे काही वर्षापूर्वी मंत्री होते. त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणूनही काम केलेले आहे. त्यांना आता सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले आहे.कवळेकर यांच्यासह एकूण दहा आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. बाबूश मोन्सेरात हे मंत्री होतील असे अपेक्षित होते. मात्र मोन्सेरात यांनी आपल्याला मंत्रीपद नको, आपली पत्नी जेनिफर यांना मंत्रीपद द्यावे अशी भूमिका घेतली. मुख्यमंत्री सावंत यांनी ते मान्य केले. जेनिफर ह्या ताळगाव मतदारसंघाच्या आमदार आहेत.
चौघे आऊटविद्यमान सरकारमध्ये बाबू आजगावकर हेही उपमुख्यमंत्री आहेत. आजगावकर हे पेडणो मतदारसंघाचे आमदार आहेत. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई हेही उपमुख्यमंत्रीपदी होते. त्यांच्यासह गोवा फॉरवर्डच्या तिन्ही मंत्र्यांना राजीनामा देण्यास मुख्यमंत्री सावंत यांनी शुक्रवारी सांगितले होते. त्यांनी राजीनामा दिला नाही. अपक्ष रोहन खंवटे यांनीही मंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही. म्हणून चौघांनाही मुख्यमंत्र्यांनी शनिवारी डच्चू दिला. सायंकाळी अनेक भाजप कार्यकत्र्याच्या उपस्थितीत राजभवनवर झालेल्या सोहळ्य़ावेळी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी चार नव्या मंत्र्यांना अधिकार व गोपनियतेची शपथ दिली. चारही मंत्र्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. सर्व मंत्री तसेच काही आमदार यावेळी उपस्थित होते. मुख्य सचिव परिमल रे यांनी सोहळ्य़ाची प्रक्रिया पार पाडली.