लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्याच्या राजकारणात येत्या दि. ५ किंवा दि. ७ डिसेंबरनंतर मोठे बदल होण्याची शक्यता आहे. विशेषतः अनेक मंत्र्यांची खाती बदलली जाण्याची दाट शक्यता काही मंत्र्यांकडून व्यक्त होत आहे. महसूल, गृह, शिक्षण आदी विविध वजनदार खात्यांसाठी काही मंत्र्यांनी लॉबिंगही सुरू केले आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्वाखाली सरकार अधिकारावर राहील. मात्र मंत्रिमंडळाची एक प्रकारे फेररचना होणार आहे. महत्त्वाची खाती काही मंत्र्यांमध्ये वितरित केली जातील. काही मंत्र्यांना आपली खाती गमवावी लागतील. महसूल खाते मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडे आहे. ते एका दुसऱ्या मंत्र्याला दिले जाऊ शकते.
बाबूशला वेगळे खाते मिळू शकते. रवी नाईक यांच्याकडे कृषी खाते असले तरी, या खात्याचे काम मोठेसे दिसत नाही. त्यामुळे ते काढून अन्य एक वेगळे खाते रवींना दिले जाण्याची शक्यता आहे. मंत्री विश्वजीत राणे यांना अन्य एखादे महत्त्वाचे खाते मिळण्याची शक्यता आहे.
पर्यटन मंत्री म्हणून रोहन खंवटे चांगले काम करत आहेत त्यांना एखादे वजनदार खाते मिळेल. मंत्री माविन गुदिन्हो, गोविंद गावडे, नीळकंठ हळर्णकर यांच्या खात्यांमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दिगंबर विषयी निर्णय होणार
आमदार दिगंबर कामत यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे की देऊ नये याविषयी देखील दि. ५ किंवा ७ रोजी निर्णय होणार आहे. ३ रोजी मध्य प्रदेशसह अन्य काही विधानसभा निवड- णुकांचे निकाल लागतील. त्यानंतर ७ डिसेंबरला बदल होतील, असे काही मंत्री सांगत आहेत. कामत यांना लोकसभा निवड- णुकीची तिकीट देण्याचे ठरले तर मग मंत्रिपद दिले जाणार नाही. अन्यथा त्यांना मंत्रिपद देऊन दक्षिण गोव्यात भाजपला बळकट केले जाणार आहे. मग सासष्टीत दोन मंत्रीपदे दिली असे सांगायलाही भाजप मोकळा होईल. कामत यांच्यासाठी मात्र मग एका हिंदूच मंत्र्याला मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार आहे.