पणजी : खाण अवलंबितांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून गोव्यातील खाण व्यवसाय लवकरात लवकर सुरु करण्यासाठी प्राधान्यक्रमे हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. या प्रश्नावर मंत्रिगटाची बैठक बोलवावी, असे गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटने शहा यांना लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली शहा यांना भेटण्याची इच्छाही या पत्रात व्यक्त केली असून त्यांची अपाँइंटमेंटही मागितली आहे.
संघटनेचे अध्यक्ष पुती गांवकर या पत्रात म्हणतात की, ‘ गेली दोन वर्षे राज्यातील खाणी बंद राहिल्याने लोकांच्या उदरनिर्वाहावर परिणाम झालेला आहे. खाणबंदीमुळे ३ लाख अवलंबित बेकार असून राज्य सरकारचे सुमारे ३५00 कोटी रुपयांचे वार्षिक नुकसान होत आहे याकडे लक्ष वेधले आहे. खाणकाम सुरू केल्यास लाखो जणांना उपजिविकेचे साधन मिळेल, लाखो कुटुंबांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न सुटण्यास तसेच राज्याची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल.’
याआधी गेल्या जानेवारीत अमित शाह यांच्याबरोबर अवलंबितांची बैठक झाली होती. केंद्र तसेच राज्यातील संबंधित सर्व शासकीय कार्यालयांना हे निवेदन सादर करण्यात आलेले आहे.
‘आढावा बैठक झालीच नाही’दरम्यान, पुती गांवकर म्हणाले की, ‘या विषयावर ३१ जुलै २०१९ पर्यंत आढावा बैठक होण्याची अपेक्षा होती, परंतु अशी कोणतीही बैठक झालेली नाही. त्यामुळे गोव्यातील खाणबंदीबाबत केंद्रीय मंत्रिगटाची बैठक लवकरात लवकर आयोजित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची विनंती आम्ही या निवेदनातून केली आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय होऊन लाखो खाण अवलंबितांचे जीवन सुरळीत होईल अशी आम्हाला आशा आहे.’
१२ जुलै शहा यांनी मंत्रिगटाच्या बैठकीमध्ये गोव्यातील खाणबंदीच्या मुद्द्यावर अभ्यास करून ही समस्या सोडवण्यासाठी योग्य शिफारशी सादर करण्याची सूचना केली होती. त्यानंतर याबाबत काय प्रगती झाली याबाबत शासनाकडून काहीच माहिती मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर उच्च स्तरावरून या प्रश्नी तातडीने मध्यस्थी करून सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.