म्हापसा : चोरी करण्याच्या उद्देशाने हॉटेलात शिरल्यानंतर हाती काहीच न लागल्याने संतापलेल्या चोरट्याने तेथे तोडफोड केली. काऊंटर जाळले. नंतर हॉटेलमधील खाद्यपदार्थ पोटभर खाऊन शेवटी त्याच हॉटेलात झोपी गेला अन् लोकांच्या तावडीत सापडला. येथील बाजारपेठेत हा प्रकार घडला. त्याला पहाटे हॉटेलमध्ये आलेल्या कामगारांनी चांगलाच चोप देवून पोलिसांच्या ताब्यात दिले. हरिहर दास ( १८ वय, बिहार ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या चोरट्याने दोन दिवसांपूर्वी बाजारपेठेतील इतर काही हॉटेल्समध्येही चोरी केली होती. सोमवारी मध्यरात्री चोरट्याने बाजारातील एका हॉटेलला लागून असलेल्या ब्युटी पार्लरमध्ये टेरसवरील पाण्याच्या टाकीवरून प्रवेश केला. तिथे चोरी करण्यासारखी एकही वस्तू त्याच्या हाती लागली नाही. रागाच्या भरात त्याने पार्लरमधील वस्तूंची नासधूस करून आग लावली. तेथील पोटमाळ्यावरून दुसऱ्या बाजूच्या हॉटेलात शिरला.
पोटाची भूक भागवण्यासाठी हॉटेलातील खाद्यपदार्थांवर मनसोक्त ताव मारला. लहर आली म्हणून सिगारेट्स ओढल्या व नंतर चोरीसाठी तो काऊंटरकडे वळला. काऊंटरमध्ये काहीच नसल्याने त्याने तेथेही आग लावली. मात्र नंतर तो तेथेच कंटाळून हॉटेलातच झोपी गेला. सकाळी हॉटेल उघडण्यास आलेल्या कामगारांना हा प्रकार लक्षात आला. कामगारांनी चोराला पकडून चोप दिला. नंतर मालक स्वप्नील पेडणेकर यांनी पोलिसांना बोलावून चोरट्याला त्यांच्या ताब्यात दिले.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी या चोरट्याने परिसरातील काही हॉटेल्समध्ये चोरीचा प्रयत्न केला होता. त्यावेळी काही रोकड त्याच्या हाती लागली होती. तेथील चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.दरम्यान, म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत, सिद्धेश राऊत यांसह व्यापाऱ्यांनी उपअधिक्षक जिवबा दळवी, निरीक्षक सिताकांत नाईक यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देवून बाजारपेठेत वाढलेल्या चोरीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. पोलिसांनी बाजारात गस्त वाढवण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.