म्हापसा : राज्यातील पर्यटन हंगाम दारावर असताना कळंगुट पंचायतीने भटक्या गुरांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी डिचोली तालुक्यातील मये-सिकेरी येथील गोमंतक गोसेवा महासंघाची नेमणूक केली आहे. तसा करार महासंघासोबत पंचायतीने केला आहे. २ ऑक्टोबरपासून मोहीम सुरू केली जाणार असून, कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या गुरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही पंचायतीने दिला आहे. जवळ आलेल्या पर्यटन हंगामापूर्वी सदरची मोहीम हातात घेण्यात आल्याची माहिती सरपंच शॉन मार्टीन्स यांनी दिली. भटक्या गुरांमुळे पंचायत क्षेत्रातील लोकांना तसेच येणा-या पर्यटकांना त्रास सहन करावा लागत होता. त्या प्रकारच्या अनेक तक्रारी पंचायतीजवळ दाखल करण्यात आलेल्या असे मार्टिन्स म्हणाले. येणा-या पर्यटकांना कळंगुट परिसरात चांगले वातावरण उपलब्ध व्हावे या दृष्टीने हे पावूल उचलण्यात आल्याचेही त्यांनी सांगतले.कळंगुट पंचायतीने महासंघासोबत केलेल्या करारानुसार पंचायत क्षेत्रातील भटक्या गुरांवर महासंघाच्या वतिने कारवाई केली जाईल. तेथून ती नंतर थेट गोशाळेत पालक पोषणासाठी ठेवली जाणार आहे. केलेल्या कराराची अंमलबजावणी २ आॅक्टोबरपासून केली जाणार आहे. त्यामुळे गुरांच्या मालकांनी आपली गुरे रस्त्यावर भटकण्यासाठी सोडू नये अशी विनंती पंचायतीकडून गुरांच्या मालकांना करण्यात आली आहे. गोशाळेत ठेवलेल्या गुरांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाणार आहे. त्यांना तेथे खाद्य पुरवले जाणार असून गरज भासल्यास आवश्यक अशा इतर सुविधा सुद्धा उपलब्ध केल्या जातील. बहुतेक गुरे रस्त्याबरोबर किनाºयावर तसेच शेतात सुद्धा आढळून आली आहे. पंचायत क्षेत्रात वाढत जाणाºया या भटक्या गुरांमुळे अपघातात वाढ झाली असून रस्त्यावर सांडलेल्या शेणामुळे वाहने घसरण्याचे प्रकारही घडले आहेत. सरपंच शॉन मार्टीन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचायत क्षेत्रातील तसेच शेजारील भागातील गुरांच्या मालकांनी आपल्या गुरांची योग्य काळजी घ्यावी. गुरे रस्त्यावर आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.कारवाई केलेल्या गुरावर मालकी हक्क सांगण्यासाठी एखाद्या व्यक्ती पुढे आल्यास त्याला कारवाई केलेली गुरे पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पंचायतीजवळ अर्ज सादर करावा लागेल. संबंधी गुरे त्याच्याच मालकीची असल्याचे त्याला सिद्ध करून दाखवावे लागणार आहे. तसा पुरावा पंचायतीजवळ सादर करावा लागणार आहे. केलेला अर्ज पशु संवर्धन खात्याच्या संचालकाजवळ त्याचे मत आजमावण्यासाठी पाठवला जाणार आहे. त्यांनी सदर मालकास मान्यता दिली तर ताब्यात घेतलेली गुरे मालकाला सुपूर्द केली जाणार आहे. संबंधीत गुरे मालकाच्या ताब्यात देण्यापूर्वी लागू केलेला दंड जमा करून नंतरच ती ताब्यात दिली जाणार आहेत. ७ दिवसाच्या आत दावा केल्यास ३ हजार रुपये तर १५ दिवसाच्या आत दावा केल्यास ५ हजार रुपये दंडाच्या रुपात जमा करावे लागणार आहे. ताब्यात घेतलेल्या गुरावर १५ दिवसांच्या आत मालकी हक्क सांगणारा दावा न केल्यास गोशाळेला गुरांचा लिलाव करून ती विकण्यासाठीची मुभा गोवा भटकी गुरे व्यवस्थापन योजना २०१३ खाली परवानगी दिली जाणार आहे. ज्या व्यक्तीजवळ दोनपेक्षा जास्त गुरे असेल अशा लोकांनाच ती विकण्याची परवानगी दिली जाणार आहे.
उद्यापासून कळंगुट पंचायतीची भटक्या गुरांविरोधात मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 3:44 PM