मडगाव : राज्य सरकारने खुला केलेला प्रादेशिक आराखडा २०२१ बिल्डरांच्या फायद्यासाठी असून हा आराखडा रद्द करावा, अशी मागणी गोवन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संघटनेने लोहिया मैदानावर आयोजित केलेल्या जाहीर सभेत केली. सुरुवातीला संघटनेचे निमंत्रक रामकृष्ण जल्मी यांनी फोंडा मतदारसंघात प्रादेशिक आराखड्यामुळे लोकांना कशा प्रकारे त्रास पडतील याची सविस्तर माहिती दिली. प्रादेशिक आराखडा हा कूळ-मुंडकारांच्या जमिनी हडप करणारा असल्याचा आरोप जल्मी यांनी या वेळी केला. फोंडा, मंगेशी, केरी या ठिकाणी मेगा प्रकल्प येणार असून सध्या मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यातील बिगरसरकारी संघटनांनी आतापर्यंत सुमारे १७ प्रकल्पांचे काम बंद पाडले आहे. केळशी येथील आयरिश पासानिया यांनी किनारी भागात सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बेकायदा बांधकामे सुरू आहेत; परंतु या बेकायदा बांधकामांवर कोणीही कारवाई करीत नाही, असे सांगितले. शिवोली येथील फातिमा गोम्स यांनी शापोरा ते कोलवाळपर्यंत इको टुरिझमच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जागा संपादन करण्यात आली असल्याचे सांगितले. गोव्यातून पोर्तुगिजांना हाकलून लावले; परंतु काही गोव्यातील नागरिक पोर्तुगीज पासपोर्ट बनवू लागले आहेत. सरकारच्या विरोधात भांडायचे असेल तर गोव्यातच राहून भांडावे लागेल, असे आवाहन केले. फा. एरेमित रिबेलो यांनी विधानसभा निवडणूक २०१७ साली होणार असून सरकारला योग्य धडा शिकविण्याची वेळ जवळ आली आहे. गोव्याच्या जनतेने याचा विचार करण्याची गरज आहे. येणाऱ्या निवडणुकीत विचारपूर्वक सर्वांनी मतदान करण्याची गरज आहे. आतापासूनच लोकांनी याबाबत विचार करावा, असे आवाहन केले. अभिजित प्रभूदेसाई यांनी या वेळी प्रादेशिक आराखड्यासंदर्भात प्रेझेंटेशन सादर केले. सिध्दार्थ कारापूरकर यांनी पेडणे ते पोळे या मार्गावर सुरू असलेल्या पश्चिम महामार्गासंबंधी माहिती व हा महामार्ग झाल्यास गोव्यातील गावांचे विभाजन होईल, अशी भीतीही व्यक्त केली. प्रादेशिक आराखड्यासंदर्भात आवश्यक पर्यावरण, आर्थिक तसेच सामाजिक विभागांची योग्य माहिती गोळा करण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)
प्रादेशिक आराखडा २0२१ रद्द करा!
By admin | Published: April 23, 2016 2:29 AM