म्हापसा : गोव्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था धी बार्देस बझार ग्राहक सहकारी संस्थेच्या गुरुवारी घेण्यात आलेल्या भागधारकांच्या विशेष सर्वसाधारण सभेत संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान संचालक जयवंत नाईक यांचे संचालकपद व संस्थेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.म्हापसा अर्बन को आॅपरेटिव्ह बँकेच्या बँक आॅफ गोवाच्या नंदादीप सभागृहात बोलावण्यात आलेल्या या सभेत हा निर्णय घेण्यात आला. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष गुरुदास सावळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. संस्थेचे संचालकपद तसेच सदस्यत्व रद्द का करू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस संचालक मंडळाने संचालक जयवंत नाईक यांना बजावली होती.संस्थेच्या चेअरमनपदावरून संचालक जयवंत नाईक व संचालक मंडळात वाद निर्माण झाला होता. जयवंत नाईक यांना संचालक मंडळाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. सुनावणीनंतर न्यायालयाने संस्थेच्या भागधारकांची विशेष सभा बोलावून निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. दिलेल्या आदेशानुसार ही सभा बोलावण्यात आलेली. त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव दाखल करुन २२ फेब्रुवारीला त्यांना अध्यक्षपदावरुन खाली खेचण्यात आले होते.संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच १६९ सदस्यांनी उपस्थिती लावली होती, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गुरुदास सावळ यांनी पत्रकारांना दिली. सावळ यांनी मांडलेल्या या ठरावाला उपाध्यक्ष डॉ. रवींद्र फोगेरी यांनी अनुमोदन दिले. यावेळी घेण्यात आलेल्या मतदानात हा ठराव १५७ विरुद्ध १२ मतांनी मंजूर करण्यात आला. सहकार कायद्यानुसार एखाद्या सदस्याचे सदस्यत्व रद्द करायचे असल्यास सभेला उपस्थित सदस्यातील एकूण तीन तृतीयांश सदस्यांचे ठरावाला अनुमोदन लाभणे आवश्यक असते. आवश्यकतेपेक्षा जास्त सदस्यांचा पाठिंबा ठरावाला लाभल्याचे सावळ यावेळी पत्रकारांना सांगितले.सभेत काही झालेल्या चर्चेवेळी काही सदस्यांनी जयवंत नाईक यांनी संस्थेला दिलेल्या योगदाना अनुसरून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव मागे घेण्याची विनंती केली होती. केलेल्या विनंतीला अनुसरुन तशी तयारी सुद्धा दाखवून जयवंत नाईक यांनी संस्थे विरोधात विविध न्यायालयात दाखल केलेले खटले मागे घेण्याची अट त्यांना लागू केली आहे. सभेला उपस्थित जयवंत नाईक यांनी खटले मागे घेण्याची भूमिका दर्शवून आपल्याला पुन्हा अध्यक्षपद बहाल करण्यात यावे असे सुचवले. संस्थेचे अध्यक्षपदावर कोणाला नेमावे हा निर्णय संचालक मंडळाचा असल्याने नाईक यांची अट नामंजूर करून ठरावावर शिक्कामोर्तब केले.बार्देश बझार ही गोव्यातील सहकार क्षेत्रातली एक अग्रगण्य संस्था. राज्यभरात त्यांच्या ७ शाखा तसेच १ फार्मसी ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. संस्थेने केलेल्या दाव्यानुसार संस्था सहकार क्षेत्रातील पहिला मॉल उभारण्याच्या मार्गावर असून, पुढील महिन्याच त्याचे कामही सुरू होण्याच्या मार्गावर आहे. गत आर्थिक वर्षात या संस्थेच्या नफ्यात साधारणपणे ३० टक्के वाढही झाली आहे.
बार्देस बाजार ग्राहक सहकारी संस्थेच्या माजी अध्यक्षांचे सदस्यत्व रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 6:28 PM