गोव्यातील लढतींनंतर उमेदवारांचा आराम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 12:55 PM2019-04-24T12:55:56+5:302019-04-24T13:01:31+5:30
गोव्यातील पाच मतदारसंघांमध्ये जोरदार टक्कर झाल्यानंतर व गेले पंचवीस दिवस प्रचंड घाम गाळल्यानंतर बुधवारी (24 एप्रिल) बहुतेक उमेदवारांनी आराम केला आहे. आपल्या कुटुंबियांसोबत उमेदवारांनी दिवस घालवला आहे.
पणजी - गोव्यातील पाच मतदारसंघांमध्ये जोरदार टक्कर झाल्यानंतर व गेले पंचवीस दिवस प्रचंड घाम गाळल्यानंतर बुधवारी (24 एप्रिल) बहुतेक उमेदवारांनी आराम केला आहे. आपल्या कुटुंबियांसोबत उमेदवारांनी दिवस घालवला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे भाजपाच्या प्रचारासाठी गोव्यातील चाळीसपैकी एकूण 38 मतदारसंघांमध्ये फिरले. बुधवारी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. आज त्यांनी सहकुटूंब आराम केला. उत्तर गोव्याचे भाजपा उमेदवार श्रीपाद नाईक, काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर, दक्षिण गोव्याचे भाजपचे उमेदवार नरेंद्र सावईकर आणि काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन यांना बुधवारी थोडी तरी विश्रांती मिळाली आहे. भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांसोबत चर्चा करून मतदानानंतरच्या स्थितीचा आढावा घेतला. कोणत्या भागात भाजपल किती मते मिळतील, कोणत्या भागात काँग्रेसला आघाडी मिळेल याचा आढावा घेतला गेला. तसेच ख्रिस्ती मतदारांनी कोणत्या भागात काँग्रेसला जास्त मतदान केले असेल, आपल्या पक्षाच्या ख्रिस्ती आमदारांमुळे भाजपला कुठच्या पंचायत क्षेत्रात ख्रिस्ती मतदान झालेले असेल याचीही गणिते भाजपाच्या कोअर टीमने मांडली आहेत.
मगोपचे उमेदवार दिपक ढवळीकर यांनी शिरोडा मतदारसंघात भाजपाचे सुभाष शिरोडकर यांच्याविरुद्ध जोरदार टक्कर दिली. शिरोडामध्ये काँग्रेसचे उमेदवार महादेव नाईक हे तिसऱ्या स्थानी आहेत. मगोप व भाजपाचे कार्यकर्त्यांनी बुधवारी मतदानाच्या सगळ्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यावर भर दिला. शिरोडकर यांनी विश्रांती घेतली. त्यांचे काही कार्यकर्ते मात्र शिरोडकर यांना कोणत्या पंचायत क्षेत्रात किती मते मिळतील याचे गणित मांडण्यात व्यस्त राहिले.
मांद्रे मतदारसंघात अपक्ष उमेदवार जित आरोलकर आणि भाजपाचे उमेदवार दयानंद सोपटे यांच्यात मोठी लढत झाली आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते गेले पंचवीस दिवस प्रचार कामात व्यस्त राहिले. काँग्रेसचे उमेदवार बाबी बागकर यांनीही खूप परिश्रम घेतले. मांद्रे मतदारसंघात काही जणांनी पैसाही खूप खर्च केला. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या समर्थकांनी आरोलकर यांच्या बाजूने मतदान केल्याची माहिती मिळत आहे. आरोलकर यांनी बुधवारी विश्रांती घेतली. तर बागकर यांनी कुटूंबियांसोबत वेळ घालविला आहे.