दोन दिवसांत ठरणार उमेदवार! भाजप संसदीय मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2024 12:26 PM2024-02-28T12:26:40+5:302024-02-28T12:27:51+5:30

उद्या काँग्रेस समितीची बैठक

candidates will be in two days important meeting of bjp and congress parliamentary board | दोन दिवसांत ठरणार उमेदवार! भाजप संसदीय मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक

दोन दिवसांत ठरणार उमेदवार! भाजप संसदीय मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार कोण? ही उत्कंठा पुढील दोन-तीन दिवसांतच दूर होणार आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक १ मार्च रोजी होणार असून, या बैठकीत दोन्ही उमेदवार ठरणार आहेत. त्यापूर्वी म्हणजे दि. २८ रोजी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होत असून, या बैठकीत भाजप उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. 

मंगळवारी दिल्लीत काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक झाली. पक्षाचे गोवा निवडणूक प्रभारी मधुसूदन मिस्त्री, प्रदेश प्रभारी माणिकराव ठाकरे व छाननी समितीवरील इतर मान्यवर उपस्थित होते. उत्तर गोव्यातून माजी केंद्रीय कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप व विजय भिके तर दक्षिण गोव्यातून विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन व कॅप्टन वीरियातो फर्नाडिस अशी दोन नावे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवण्याचे ठरले आहे. दोन्ही मतदारसंघांतून प्रत्येकी आठ नावे आली होती. परंतु आता केवळ या चार नावांवरच लक्ष केंद्रित झालेले आहे.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ सलग पाच लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपकडे राहिलेला आहे. तो काबीज करण्याचे आव्हान काँग्रेससमोर असेल. त्यामुळे त्या ताकदीचाच उमेदवार पक्षाला द्यावा लागेल. त्यासाठी काँग्रेसनेही दोन नावांची निवड केली असून, अंतिम निर्णय १ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत होणार आहे.

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर गोव्यात आम आदमी पक्ष व काँग्रेसने युती केली आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी भाजपला उमेदवार निवडताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, हे निश्चित.

सावळ लोकसभा लढविण्यावर ठाम

माजी अपक्ष आमदार नरेश सावळ लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. अपक्ष म्हणून की एखाद्या पक्षाच्या निशाणीवर रिंगणात उतरायचे हे नंतर ठरवणार असल्याचे ते म्हणाले. सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करु दे त्यानंतर तुम्हाला कळणार की, मी रिंगणात आहे कि नाही, असे ते म्हणाले.

मला डावलल्यास नेत्यांनी लोकांना स्पष्टीकरण द्यावे

दक्षिण गोव्यासाठी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार एल्विस गोम्स म्हणाले की, लोकसभेसाठी मी सर्वप्रथम उमेदवारी मागितली होती. मला जर डावलले तर पक्षाच्या नेत्यांनी लोकांसमोर जाऊन याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल. दक्षिण गोव्यासाठी माझी उमेदवारी किती योग्य आहे, हे मी दाखवून दिले आहे. तरीही पक्ष साथ देत नसेल तर पक्षाला लोकांनाच कारण सांगावे लागणार आहे, असा इशाराच गोम्स यांनी दिला आहे.

संसदीय मंडळाच्या बैठकीत ठरणार भाजपचा उमेदवार

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे केंद्रीय नेते गोवा पुड्डुचेरी, मणिपूर आदी लहान राज्यांचे उमेदवार गुरुवारी, २९ रोजी निवडणार आहेत. त्यासाठी दिल्लीत पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाची बैठक गुरुवारी होत आहे. भाजपच्या प्रदेश निवडणूक समितीकडून उत्तर गोव्यातून केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, दयानंद सोपटे, माजी मंत्री दिलीप परुळेकर व माजी आमदार दयानंद मांदेकर, अशी चार तर दक्षिण गोव्यातून माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, आमदार दिगंबर कामत, सभापती रमेश तवडकर व प्रदेश सरचिटणीस दामू नाईक, अशी पाच नावे केंद्रीय संसदीय मंडळाकडे पाठवली आहेत.

 

Web Title: candidates will be in two days important meeting of bjp and congress parliamentary board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.