लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यातील दोन जागांवर काँग्रेस उमेदवारांची यादी तिकिटासाठी रस्सीखेच असल्यानेच रखडली असून, आता ती उद्या, रविवारी ईस्टरच्या मुहूर्तावरच जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत.
उत्तर गोव्यासाठी माजी केंद्रीय कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळते. दक्षिण गोव्यात विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन व माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यात चुरस आहे. उमेदवारांच्या नावांवर अद्याप एकमत होत नाही. इच्छुक उमेदवारांमधील रस्सीखेच व स्थानिक पातळीवर नेत्यांच्या असलेल्या गटबाजीचा अनुभवही पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना घ्यावा लागला आहे. सार्दिन यांचे नाव पुन्हा वर आले आहे. माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व सार्दिन यांच्यात तिकिटासाठी स्पर्धा आहे, तर उत्तर गोव्यात रमाकांत खलप व सुनील कवठणकर यांच्यात स्पर्धा आहे.
भाजपने गोव्यातील आपले दोन्ही उमेदवार जाहीर केले तरी काँग्रेसमध्ये तिकिटाबाबतचा गुंता सुटलेला नाही. उत्तरेतून विजय भिके, राजन घाटे तसेच दक्षिणेत विरियातो फर्नांडिस यांच्या नावाचीही चर्चा होती. फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ८० टक्के नवे चेहरे दिले होते. त्यामुळे लोकसभेसाठीही पक्ष नवीन चेहऱ्यांना संधी देईल, असे काहींना वाटते.
काँग्रेसमध्ये उत्तर व दक्षिण गोव्याच्या उमेदवारीवरून मोठ्या प्रमाणात खलबते सुरू आहेत. भाजपने आपले दोन्ही उमेदवार जाहीर करून प्रचार कार्याला सुरुवात केली आहे. भाजपचे उमेदवार आपापल्या मतदार संघातील देवस्थानांना भेटी देत आहेत. दरम्यान, काँग्रेस लोकसभेसाठी उद्या, रविवारी उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती मिळत असून सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
नावांवरुन पक्षांतर्गत वाद
फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ८० टक्के नवे चेहरे दिले होते. त्यातील बरेचजण निवडूनही आले. खुद्द युरी आलेमाव, केदार नाईक, एल्टन डिकॉस्टा, राजेश फळदेसाई, डिलायला लोबो, रुडॉल्फ फर्नांडिस यांचा यात समावेश होता. त्यामुळे आता लोकसभेसाठीही नवीन चेहरे द्यावे, असे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीला वाटत आहे. तसा विचारही केंद्रीय नेत्यांनी स्थानिक नेत्यांकडे बोलून दाखवला. उत्तर गोव्यातून सुनील कवठणकर व दक्षिण गोव्यातून गिरीश चोडणकर यांना तिकीट देण्याचा विचार निवडणूक समितीने व्यक्त केल्यावर प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांच्यासह काँग्रेसच्या दोन्ही आमदारांनी या गिरीश व कवठणकर यांच्या नावांना विरोध केल्याची माहिती मिळते.
उद्या स्पष्ट होईल
'लोकमत'ने पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, रविवारीच उमेदवार जाहीर होतील. केंद्रीय निवडणूक समितीने बैठकीत गोव्यातील नेत्यांची मते जाणून घेतलेली आहेत. त्यानुसार निर्णय घेऊन आता थेट समितीच उमेदवार जाहीर करणार आहे.
योग्य उमेदवार देणार
दिल्लीहून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, यावेळी लोकसभेसाठी आम्हाला असा योग्य उमेदवार द्यायचा आहे जो संसदेत गोव्याचे विषय प्रभावीपणे मांडेल. उमेदवार जाहीर झालेले नसले तरी आम्ही फिल्डवर काम सुरू केलेले आहे.
आम्ही उमेदवार आयात करणार नाही
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव म्हणाले की, पक्षाचे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने योग्य पध्दतीने काम सुरू आहे, आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास ठेवतो. आम्ही उमेदवार आयात करणार नाही. काँग्रेस केडरचाच उमेदवार देणार आहोत. लोकांशी कनेक्ट असलेला, गोव्याच्या प्रश्नांवर आवाज उठवणारा असा उमेदवार देऊ.