पणजी : अन्य राज्यांमधून रस्तामार्गे किंवा रेल्वे अथवा अन्य वाहनांनी गोव्यात प्रवेश करणाºयांची गोव्यात पोहोचल्यानंतर हेळसांड होत असल्याच्या वाढत्या तक्रारी येत आहेत.
गोव्यात प्रवेश करताच कोवीड चाचणीसाठी नेले जाते. खोल्या उपलब्ध नसल्याने नसल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या लोकांना रात्रभर फिरवले जाते. काहींना पदपथावर बसून रात्र काढावी लागते तर काहींना कारगाड्यांमध्ये रात्र गुजरावी लागते. जेवण, चहा- पाणीही मिळत नाही. लहान मुले महिला यांचीही मोठी परवड होते. ज्येष्ठ नागरिक व महिलांनासुद्धा आपले कोविड चाचणी अहवाल मिळेपर्यंत ताटकळत रहावे लागते, अशा तक्रारी आहेत.
आमदार सुदिन ढवळीकर यांनी असाच एक प्रकार निदर्शनास आणून देताना सांगितले की, बंगळुरु येथे बीइ कम्प्युटर इंजिनीयरिंगसारखे उच्च शिक्षण घेणारी ६ मुले रविवारी सकाळी ९ वाजता पोळें चेकनाक्यावर पोचली. तेथून त्यांना कोविड तपासणीसाठी फोंड्याच्या आयडी इस्पितळात आणण्यासाठी दुपारचे ३.३0 वाजले तब्बल तीन तास या इस्पितळात त्यांना रहावे लागले व त्यानंतर रात्री ९.३0 वाजता फर्मागुढी येथील टुरिस्ट रेसिडेन्सीमध्ये नेले. गोव्यात पोचल्यानंतर तब्बल १२ तास त्यांची अशी परवड झाली.
दुसरीकडे दिल्लीवरुन आलेल्या व आपल्या कोविड चाचणी अहवालाची प्रतीक्षा करणाऱ्या गोमंतकीय प्रवाशांना संपूर्ण रात्र फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर उपाशीपोटी खुर्चीवर बसून तर काहीजणांना स्टेडियमवर खुर्चीखाली झोपून रात्र काढावी लागल्याचे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी सांगितले.