पणजी : राजधानी शहरात येत्या १३ रोजी कार्निव्हलचे आयोजन करण्यात असून गेल्या वर्षी मिरवणूक झालेल्या दिवजा सर्कल ते कला अकादमी या मार्गावरच यंदाही परेडबाबत महापालिका ठाम आहे. ‘ खा, प्या मजा करा असा संदेश देत १३ रोजी किंग मोमोची चार दिवसांची राजवट राज्यात सुरु होईल. राजधानीसह ठिकठिकाणी कार्निव्हल मिरवणुका होणार आहेत.
पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी सोमवारी बैठक घेऊन कार्निव्हलची तारीख निश्चित केल्याचे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘बैठकीत शहराबाहेर मिरामार सर्कल ते दोनापॉल मार्गावर परेड व्हावी, असा काहीजणांचा प्रस्ताव होता. मात्र महापालिका गेल्या वर्षीच्याच वरील मार्गावर ठाम आहे. शहरातील चर्च स्क्वेअरजवळ असलेल्या उद्यानासमोर सांबा स्क्वेअरमध्ये दरवर्षीप्रमाणे चार दिवस कार्निव्हलचे कार्यक्रम होती. यंदा १३ ते १६ तारीखपर्यंत हे कार्यक्रम होणार आहेत.
मडकईकर म्हणाले की, ‘कोविड महामारीमुळे शिष्टाचार प्रक्रियेचे पालन करुनच कार्निव्हलचे कार्यक्रम होतील. सांबा स्क्वेअरमध्ये कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाºयांना मास्क वगैरे दिले जातील. दरवर्षी खाजगी कंपन्यांकडून पुरस्कृत निधी मिळत असे. परंतु यंदा महामारीमुळे या निधीची अपेक्षा धरण्यात आलेली नाही. सरकारकडून जो काही निधी मिळेल त्यातूनच खर्च भागविण्यात येईल. कोविडमुळे गेला बराच काळ इव्हेंट झालेले नाहीत. लोकही कार्निव्हलसाठी उत्सुक आहेत. महामारीबाबत लोक आता स्वत:ची काळजी घेऊ लागले आहेत त्यामुळे कार्निव्हल मिरवणुकीचे आयोजन करण्यात काही गैर नाही, असे मत महापौरांनी व्यक्त केले.