पणजी : कार्निवल उलटला आणि गोव्याच्या पर्यटन व्यवसायिकांना पुन्हा पर्यटकांची प्रतीक्षा लागली. कार्निवल आणि व्हॅलेंटाईन डे केवळ एका दिवसाच्या फरकाने आणि तोही विकेन्डला आल्याने गेला आठवडा किनाऱ्यावरील शॅक व्यवसायिक, गोव्याचे ट्रॅव्हल एजंट, हॉटेल व्यवसायिक, टॅक्सी व्यवसायिक तसेच रिक्षा, मोटरसायकल पायलट व खाजगी बसमालक यांना गेला आठवडा दिलासादायक ठरला होता. परंतु पुन्हा पर्यटकांची संख्या घसरली आहे.
शनिवार १३ आणि रविवार १४ असे गेल्या विकेंडला कार्निवल आणि व्हॅलेंटाइन डे केवळ एक दिवसाच्या फरकाने जुळून आले. देशातील इतर कोणत्याही राज्यांमध्ये व्हॅलेंटाईन डे साठी प्रेमी जोडप्यांना मुक्त वातावरण मिळत नाही. गोव्यात ते वातावरण मिळत असल्याने बहुतांशी नवविवाहीत जोडपी तसेच प्रेमिक व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी गोव्यात येत असतात. त्यामुळे गोव्यातील हॉटेल व्यवसायिक, शॅकमालक, टॅक्सी व्यवसायिक व पर्यटन व्यवसायिक व पर्यटनाशी संबंधित इतर धंदेवाल्यांना हा दुग्धशर्करा योग होता.
१३ रोजी पणजीत कार्निवल मिरवणूक झाली.' खा, प्या, मजा करा', असा संदेश देत चार दिवसांची राजवट घेऊन 'किंग मोमो' राज्यात अवतरला. पणजी शहराच्या चर्च चौकातील सांबा स्क्वेअरमध्ये चार दिवस धूम होती. कोविडच्या सर्व मार्गदर्शक तत्वांना हरताळ फासण्यात आला. महापालिकेने सर्वांना कोविड शिष्टाचार प्रक्रिया अर्थात मास्क परिधान करणे, शारीरिक दुरी राखणे आदी निर्देश देऊन हा कार्यक्रम घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या आश्वासनाला महापालिका कितपत जागली हा संशोधनाचा विषय आहे. सांबा स्क्वेअरमध्ये
चार दिवस अक्षरशः धूम होती. शारीरिक दूरी, मास्क परिधान करणे या गोष्टींचा कोणताही मागमूस नव्हता. शनिवार, रविवार आणि वीकेन्डला गोव्याच्या कोणत्याही किनारी भागाला भेट दिली तर असे बेमुर्वत वागणे सर्रास दिसून येते. गोव्यात येणारे पाहुणे हे जिवाचा गोवा करण्यासाठी आलेले असतात खास करून दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू मधील पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात येत असतात. कार्निवल आणि व्हॅलेंटाइन डे त्यांच्यासाठी पर्वणी होती परंतु त्यानंतर संख्या मात्र घटली आहे.
दाबोळी विमानतळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार्निव्हलला गेल्या विकेंडला २३,४७३ देशी पर्यटकांची गोव्यात ये-जा झाली. ७४ विमाने आली आणि ७४ विमानांचे प्रयाण झाले. ११,१९५ प्रवासी आले तर १२,२७८ प्रवाशांनी गोव्याहून प्रयाण केले.