मडगाव: होळी उत्सवाच्यादरम्यान राजबाग-काणकोण येथे आलेली आयरिश युवती डॅनियली मॅक्लॉग्लिन हिच्यावर बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोप असलेल्या काणकोण येथील विकट भगत याच्याविरुद्धची सुनावणी सीसीटीव्ही फुटेजची क्लोन प्रत संशयिताला न दिल्यामुळे रखडली होती. बुधवारी अभियोग पक्षाने ही क्लोन प्रत न्यायालयाला सादर केल्यानंतर ही प्रत संशयिताकडे सुपूर्द करण्यात आली.दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश सायोनोरा लाड यांच्यासमोर ही सुनावणी चालू असून या प्रकरणात आंतरराष्ट्रीय स्तरांवरून दबाव असल्यामुळे ही सुनावणी दररोज घ्यावी, अशी मागणी अभियोग पक्षातर्फे करण्यात आली होती. मात्र क्लोन प्रत न मिळाल्यामुळे आतापर्यंत ही सुनावणी रखडली होती.ही प्रत सादर केल्यानंतर आता आरोप निश्चितीपूर्वीचा युक्तिवाद करण्यासाठी 27 नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आल्याची माहिती सरकारी वकील व्ही. कोस्ता यांनी दिली. काणकोण पोलिसांनी हैदराबादहून ही क्लोन प्रत मिळवली आहे, अशी माहिती काणकोणचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई यांनी दिली.या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, होळीच्या दरम्यान गोव्यात पर्यटक म्हणून आलेल्या मॅक्लॉग्लीन हिचा 14 मार्च रोजी राजबाग - काणकोण येथे विवस्त्रवास्थेत मृतदेह सापडला होता. तिच्या अंगावरील जखमांवरून हा खुनाचा प्रकार असल्याचे उघड झाले होते. तिचा खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचेही उघड झाले होते.ही खुनाची घटना होण्याच्या काही तासांपूर्वी संशयित विकट भगत व डॅनियली यांना एका रेस्टॉरंटजवळ पाहिले होते. या रेस्टॉरंटच्या सीसीटीव्ही कॅमे-यावरही त्या दोघांच्या हालचाली चित्रीत झाल्या होत्या. त्यावरून पोलिसांनी नंतर विकटला अटक करून बलात्कार करून खून करणे या आरोपाखाली न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले होते. संशयिताचे वकील अरुण ब्राझ डिसा यांनी या चित्रफितीची क्लोन कॉपी संशयिताला मिळावी, असा अर्ज केला होता. अॅड. डिसा यांच्या मते या खुनाचे हे संपूर्ण प्रकरण संशयित व मृत यांना शेवटच्या क्षणी एकत्र पाहिल्याच्या पुराव्यावर अवलंबून असून, त्यामुळे या चित्रफितीची प्रमाणित प्रत अभ्यासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचा दावा केला होता. जोपर्यंत ही क्लोन प्रत मिळत नाही तोपर्यंत संशयिताच्यावतीने बाजू मांडणे अशक्य असल्याची भूमिका घेतली होती.सात महिन्यांपूर्वी घडलेल्या या खुनामुळे संपूर्ण युरोप हादरून गेला होता. या प्रकरणात केवळ एका विकटचाच हात नसून इतरांचाही त्यात समावेश असावा असा संशय त्यावेळी मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता. त्यानंतर विकटनेही आपल्या बहिणीला लिहिलेल्या एका पत्रात या खुनात आपला हात नसून आपल्या मित्रांचा हात असल्याचा दावा केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते.
आयरिश युवती खून प्रकरणात शेवटी संशयिताला क्लोन कॉपी, दररोज सुनावणी घेण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 4:43 PM