लोकमत न्यूज नेटवर्क वास्को: चिखली चर्चचे धर्मगुरू फा. बोलमॅक्स परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केल्याने असंख्य शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.४) संध्याकाळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी व हिंदूत्ववाद्यांनी वास्को पोलीस स्थानकाबाहेर जमून फा. बोलमॅक्स यांना अटक करण्याची मागणी करत ठाण मांडले. रात्री उशिरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
गुरूवारी रात्री हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी वास्को पोलीस स्थानकावर जमून फा. बोलमॅक्सविरुद्ध तक्रार देऊन कारवाईची मागणी केली. तक्रारीनंतर त्याचे काय झाले जाणून घेण्यासाठी शुक्रवारी उशिरा मोठ्या संख्येने शिवप्रेमी आणि हिंदूत्ववादी कार्यकर्ते पोलिस स्थानकाबाहेर जमले होते.
फा. बोलमॅक्स यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून शिवप्रेमींच्या भावना दुखवल्यानंतर राज्यभरातून टीका होऊ लागली. त्यानंतर शिवप्रेमींनी वास्को पोलिसात त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन कोणती कारवाई केली हे जाणून घेण्यासाठी शुक्रवारी वास्को पोलीस स्थानकाबाहेर शिवप्रेमी व हिंदूत्ववादी जमले. यावेळी पोलिसांनी तक्रारीची घेतली नसून फा. परेरा यांच्याविरोधातही कोणतीच कारवाई केली नसल्याचे समजातच शिवप्रेमी आक्रमक झाले व पोलिसांच्या कृतीचाही निषेध करत घोषणाबाजी केली.
कारवाई करा, तरच माघार घेऊ
बघता बघता वास्को पोलिस ठाण्याबाहेर शिवप्रेमींचा जमाव वाढू लागला. पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नसल्यामुळे ते चांगलेच भडकले होते. त्यामुळे आताच कारवाईची मागणी करत पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच शिवप्रेमींनी घोषणाबाजी सुरू केली. यावेळी फा. बोलमॅक्स यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला.
कलम २९५, ५०४...
शिवप्रेमी आक्रमक झाल्यानंतर वास्को पोलिसांनी रात्री उशिरा फा. बोलमॅक्स यांच्याविरुध्द भादसंच्या कलम २९५, ५०४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. तसेच त्याची प्रत शिवप्रेमींना दाखवली. परंतु, केवळ गुन्हा नोंद नको, त्यांना अटक केल्याशिवाय मागे हटणार नाही. असा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे.
बंदोबस्त वाढवला
वास्को पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने शिवप्रेमी जमले आहेत. त्यामुळे या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून इतर ठिकाणी पोलिस कुमक मागवून बंदोबस्त वाढविण्यास सुरुवात केली.
वास्कोत जमावाच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक जातीने उपस्थित आहेत. पोलिस योग्यरीत्या परिस्थिती हाताळतील. कायद्याने जे काही करणे शक्य आहे, ते केले जाईल. पण, शिवप्रेमींनी पोलिसांना सहकार्य करावे. -डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री