पणजी : श्रीलंकेतील कॅसिनो व्यावसायिकांचा डोळा आता गोव्यात कॅसिनोंमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडे वळला आहे. गोव्यात मोठमोठ्या जाहिराती करून या ग्राहकांना श्रीलंकेतील कॅसिनोंकडे वळविण्याचे प्रयत्न चालू आहेत.
गोव्यात जुगार खेळण्यासाठी हजारोंच्या संख्येने देशी पर्यटक येत असतात. शनिवार-रविवारी विक एंडला येथील मांडवी नदीत असलेल्या तरंगत्या कॅसिनोंवर पर्यटकांची झुंबड उडते. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी शुक्रवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत श्रीलंकेतील केसेना व्यावसायिकांनी चालवलेल्या जाहिरातबाजीचा विषय विषय उपस्थित केला. सध्या येथील मांडवी नदीत ६ तरंगते कॅसिनो आहेत. शिवाय मेजेस्टिक तसेच अन्य हॉटेलांमध्ये जमिनींवरही कॅसिनो आहेत. या कॅसिनोंमध्ये जुगार खेळण्यासाठी येणाऱ्यांना जाहिरातींद्वारे वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून श्रीलंकेत जुगार खेळण्यासाठी वळविण्याचे प्रयत्न चालले आहेत. राज्यात आहेत त्या परवानाधारक कॅसिनो व्यावसायिकांना वाऱ्यावर सोडून राज्य सरकारने श्रीलंकेच्या कॅसिनो व्यावसायिकांना अआंदण दिले आहे का? असा सवाल सरदेसाई यांनी केला.
गोव्यात कॅसिनो चालवणाऱ्या एका व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार गोवा जुगार कायद्याच्या कलम १२ चे उल्लंघन करून या जाहिराती केल्या जात आहेत. सरकारचे परवाने नसलेल्या कॅसिनोंची किंवा कोणत्याही प्रकारच्या जुगाराची जाहिरात करण्यास या कलमाद्वारे प्रतिबंध आहे. या कायद्याच्या कलम १३ अ खाली ज्यांना परवाने प्राप्त आहेत त्यांनाच अशा प्रकारची जाहिरात करता येते. कायद्याचे उल्लंघन करून जुगाराची जाहिरातबाजी केल्यास संबंधिताला पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यावरच्या हुद्यावरील पोलिस अधिकारी अटक करू शकतो.
कॅसिनो व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार गोव्यातील ३० ते ४० टक्के कॅसिनो ग्राहक श्रीलंकन कंपन्यांनी वळविले आहेत. या कंपन्यांनी गोव्यात बेकायदा कार्यालये थाटलेली आहेत. परवानाधारक कॅसिनो मालकांकडून गोवा सरकारला कर तसेच अन्य शुल्क कांचा माध्यमातून दरवर्षी ४०० कोटी रुपये महसूल प्राप्त होतो. मात्र श्रीलंकेतील या कॅसिनो व्यावसायिकांकडून पैदेखील मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकारने याबाबतीत पावले उचलण्याची गरज आहे, असे मत परवानाधारक व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, राजधानी शहरात बेलीस व बेलाजिओ या श्रीलंकेतील कॅसिनोंच्या जाहिराती झळकलेल्या पहायला मिळतात.