बंगळुरू : केंद्रीय मंत्री आणि गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्या कारला सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. कर्नाटकच्या अंकोला तालुक्यात झालेल्या या अपघातात नाईक यांची पत्नी आणि त्यांचा स्वीय सहाय्यकाचा मृत्यू झाला. तर नाईक यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात असून त्यांना लगेचच गोव्य़ाला हलविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार नाईक गोकर्णला जात होते. त्यांनी लवकर पोहोचण्यासाठी एनएच-63 वर शॉर्टकट पकडला होता.
श्रीपाद नाईक यांनी पकडलेला रस्ता हा खूप खराब होता. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्या वाहनाची कोणत्याही अन्य वाहनाशी टक्कर झाली नाही. प्रथम दृष्ट्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. कारमध्ये चारजण प्रवास करत होते. यामध्ये नाईक यांच्यासह त्यांची पत्नी, चालक आणि खासगी सेक्रेटरी होता. पत्नी विजया यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात नाईक यांच्या सेक्रेटरीचा देखील मृत्यू झाला.
सोमवारी नाईक यांनी कर्नाटकमधील एका कार्यक्रमात भाग घेतला होता. यावेळी कर्नाटकचे मंत्री शिवराम हेब्बार यांनी त्यांचे स्वागत केले होते. यानंतर ते उडुपीच्या कृष्ण मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेथून ते यल्लापूरच्या गंटे गणपती मंदिरातही पूजा करण्यासाठी गेले. यानंतर ते तेथून सायंकाळी ७ च्या सुमारास गोकर्णसाठी रवाना झाले. यावेळी त्यांनी मुख्य रस्त्याने लागणारा वेळ वाचविण्यासाठी उपरस्ता निवडला. हा रस्ता खड्ड्यांनी भरलेला होता. यामुळेच एखादा खड्डा चुकविण्याच्या नादात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याकडेला झाडीझुडपांवर जाऊन आदळली. यामध्ये कारचा चेंदामेंदा झाला.
मोदींच्या गोवा मुख्यमंत्र्यांना सूचनापंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या अपघाताचे वृत्त समजतात त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी तातडीने संवाद साधला. तसेच नाईक यांच्यावर तातडीने उपचारांची व्यवस्था करण्याची सूचना केली. श्रीपाद नाईक हे भाजपाचे गोव्यातील ज्येष्ठ नेते असून, ते गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सध्या मोदी सरकारमध्ये ते आयुष मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत आहेत.