पणजी - गोव्यात नागरी पुरवठा खात्याच्या अकरा गोदामांमधील सुमारे 707 मेट्रिक टन गहू वेळीच कीटकनाशकांची फवारणी न झाल्याने कीड लागून खराब झाला आहे. जूना आणि खराब माल नवीन गव्हामध्ये मिसळून तो सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे लोकांना वितरित केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. सरकारने यात हस्तक्षेप करावा,अशी मागणी होत आहे. दुसरीकडे खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी आचारसंहितेच्या फेऱ्यात कंत्राट अडकल्यानेच कीटकनाशकाची फवारणी रखडल्याचे सांगितले.
राज्यात दारिद्र्य रेषेवरील १ लाख ९0 हजार शिधापत्रिकाधारक आहेत. प्रती रेशन कार्ड ७ किलो गहू ९ रुपये १0 पैसे दराने तसेच ८ किलो तांदुळ प्रती किलो ११ रुपये ६0 पैसे दराने दरमहा दिले जातात. रेशन दुकानांवर पाठवलेला हे निकृष्ट धान्य सरकारने त्त्वरित मागे घ्यावे आणि नवीन माल पुरवावा, अशी मागणी होत आहे.
नागरी पुरवठा खात्याच्या गोदामांमधून दर महिन्याला साधारणपणे २ तारीखपासून त्या महिन्याचा कोटा उचलण्यास सुरवात होते व वाहतूकदार रेशन दुकानांना धान्य पुरवित असतात. गोव्याला धान्य पुरवठा पंजाबहून होतो. वास्को रेल्वे यार्डात हा माल आल्यानंतर हा माल आधी भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात आणि नंतर नागरी पुरवठा खात्याच्या गोदामांमध्ये पाठवला जातो. मिळालेल्या माहितीनुसार रेशनवर वितरणासाठी दर महिन्याला सुमारे ३६४0 मेट्रिक टन तांदुळ तर १३१३ मेट्रिक टन गहू लागतो. भटिंडा पंजाबहून सोलापूरमार्गे रेल्वे वाघिणीतून गहू तर लुधियानामधून तांदूळ येतो.
गहू कीड लागून खराब होण्याचे कारण शोधले असता खात्याने वेळीच कीटकनाशकांची फवारणी गोदामांमध्ये केली नसल्याचे निष्पन्न झाले. दर तीन महिन्यांनी दोनवेळा गोदामात किटकनाशकाची फवारणी केली जाते. ती गेले पाच महिने झालेली नाही. शिधापत्रिकाधारकांना धान्यावर सवलत देण्याऐवजी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (डीटीएफ)अर्थात जी काही सवलत आहे त्याची रक्कम थेट खात्यात जमा करण्याची नवी योजना विचाराधीन आहे. ती केव्हाही लागू होऊ शकते याच कारणास्तव उचल होणार नसल्याच्या सबबीखाली कीटकनाशकांची फवारणी केली नसल्याचे कारण पुढे आले आहे.
आचारसंहितेमुळे कंत्राट रखडले
नागरी पुरवठा खात्याचे संचालक गोविंद गावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कीटकनाशकांच्या फवारणीचे कंत्राट देण्याचे काम सततच्या निवडणूक आचारसंहितेमुळे खात्याकडून राहून गेले. पण आता मी संचालकांना त्यांच्या अधिकारात कोटेशन घेऊन कंत्राट बहाल करण्याचे पूर्ण अधिकार दिलेले आहेत. नागरी पुरवठा खात्याच्या सर्व गोदामांची दैनावस्था झाल्याचे त्यांनी मान्य केले. त्याचबराबेर फोंडा येथील गोदामाच्या नूतनीकरणासाठी २१ लाख रुपये मंजूर केले असल्याचे सांगितले. मुरगांव आणि सासष्टी तालुक्यातील लोकांना धान्य पुरविणाऱ्या कुठठळी येथील गोदामाच्या नूतनीकरणाचेही काम प्राधान्यक्रमे हाती घेतले जाईल. ते पुढे म्हणाले की ‘ माझ्याकडे हे खाते आल्यास केवळ दोन महिने झाले आहेत. अनेक गोष्टी करण्याच्या आहेत त्यासाठी किमान सहा महिने तरी द्या’ गोदामात माल पडून राहण्यामागे स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्याची उचल न होणे हेही एक कारण आहे. लोकांच्या गरजेनुसार धान्य मागविले जाते मात्र लोक रेशनवर उचलच करीत नाहीत. जुने आणि खराब झालेले धान्य नव्या धान्यात मिसळ करुन देण्याचे प्रकार घडत असतील तर ते गंभीर आहेत. हे प्रकार त्वरित बंद करु, असे गावडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.