पणजी : अभिनेत्री तथा भाजप नेत्या सोनाली फोगाट खून प्रकरणी चौकशीसाठी सीबीआयचे पथक दिल्लीहून दुपारी गोव्यात दाखल झाले आहे.
गोवा पोलिसांकडून हे प्रकरण काढून घेऊन गेल्याच आठवड्यात सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. हरयाना येथील अभिनेत्री सोनालीचा हणजूण येथील एका हॉटेलात जबरदस्तीने ड्रग्स पाजून खून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी पाच जणांना अटकही केली होती पैकी ज्या कर्लीस शॅकमध्ये सोनालीला ड्रग्स पाजण्यात आले त्या शॅकचा मालक एडविन नुनीस यालाही अटक झाली होती परंतु नंतर त्याला सशर्त जामीन मंजूर झाला. नुनीस वगळता अन्याय सर्वजण अजूनही कोठडीत आहेत.
सोनाली प्रकरण सीबीआयकडे सोपविण्या साठी गोवा सरकारवर मोठा दबाव होता. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केली होती तसेच सोनालीची कन्या व इतर नातेवाईकांनीही प्रकरण सीबीआयकडे द्यावे, असा आग्रह धरला होता. हरयाणातील खाप महापंचायतीने ठराव घेऊन २३ सप्टेंबर पर्यंत प्रकरण सीबीआयकडे न दिल्या २४ रोजी मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्वरित हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येत असल्याचे जाहीर केले आणि त्याच दिवशी सायंकाळी केंद्रीय गृह मंत्रालयाने याला हिरवा कंदील दाखवला. सीबीआयचे अधिकारी आता या अनुषंगाने गोव्यात तळ ठोकून आहेत. शॅकचा काही भाग सी आर झेड उल्लंघनाचा ठपका ठेवून पाडण्यात आलेले आहे. सोनाली मृत्यू प्रकरण संवेदनशील असल्याने या प्रकरणाच्या चौकशीसाठी मोठा दबाव आहे.
सोनालीचा व्यवस्थापक सुधीर संगवान व सहकारी सुखविंदर सिंग यांना सर्वात आधी अटक करण्यात आली. त्यांनीच सोनालीला जबरदस्तीने ड्रग्स पाजल्याचा आरोप आहे.त्यानंतर नुनीस याच्यासह अन्य दोघांना मिळून एकूण पाच जणांना व पोलिसांनी अटक केली. सीबीआयचे पथक शॅकला तसेच या हॉटेलात सोनाली वास्तवच होती तिथे भेट देऊन चौकशी करणार आहे.