पणजी : दिव्यांगांसाठीच्या राखीव पार्किंग जागेत भलतीच वाहने ठेवण्यात येत असल्याने या प्रकाराची गंभीर दखल घेत उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी राजधानी शहरात ज्या सहा जागा अशा पार्किंगसाठी अधिसूचित आहेत तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पोलिसांनी या जागांवर आकस्मिक भेटी देऊन दंडात्मक कारवाई करावी, असे बजावले आहे.अतिरिक्त जिल्हाधिकारी विकास गावणेकर यांनी वाहतूक पोलिस उपाधीक्षकांना वरील निर्देश दिलेले आहेत. एक जागरुक नागरिक मुकुंदराज मुद्रस हेही दिव्यांगांवर होणा-या या अन्यायाचा पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सातत्याने याबाबतीत तक्रारीही केलेल्या आहेत. डिसेबिलिटी राइटस असोसिएशन ऑफ गोवा या संघटनेचे अध्यक्ष आवेलिनो डिसा यांनीही अलीकडेच शहर पोलिसांत तक्रार करून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांसाठी राखीव जागा दर्शविणारा फलक उलटा फिरविण्यात आल्याचे निदर्शनास आणले होते. पोलिसांनी त्यानुसार अज्ञातांविरुद्ध पीडीपी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हाही नोंदविला आहे.दिव्यांगांसाठी पार्किंगकरिता या आहेत ६ जागा!१. कदंब बसस्थानकावर २. विद्युत भवनसमोर ३. जुन्ता हाऊस इमारतीसमोर ४. समाजकल्याण खात्यासमोर ५. सरकारी मुद्रणालयाजवळ ६. ईडीसीनजीक श्यामराव विठ्ठल बँकेजवळ दिव्यांगांसाठी राखीव पार्किंग जागा आहेत. दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या पार्किंग जागेत इतर लोकांबरोबरच सरकारी वाहनेही बिनदिक्कत ठेवून दिव्यांगांना त्यांचा हक्क नाकारण्यात येत असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. त्यामुळे शहरातील या सहा पार्किंग जागांमध्ये प्रत्येकी किमान एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा, असे बजावण्यात आले आहे.
दिव्यांगांसाठी राखीव पार्किंग जागेत सीसीटीव्ही, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 10:24 PM