लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: येत्या दिवाळीत नरकासुरांचा उदो उदो करूच नका, त्यापेक्षा श्रीकृष्ण उत्सव साजरा करा, आपली संस्कृती जपा असे आवाहन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी रविवारी मडगावात केले. राजेंद्र प्रसाद मैदानावर एमसीसी सभागृहात नावेली व मडगाव केंद्र सरकारच्या आरडीएसएस पॅकेज वीज प्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मडगावचे आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्षा दीपाली सावळ, नावेलीचे जिल्हा पंचायत सदस्य एडवीन कार्दोज, दवर्लीचे जिल्हा पंचायत सदस्य परेश नाईक अधीक्षक अभियंता राजीव सामंत उपस्थित होते.
नरकासुर प्रथा संपूर्ण गोव्यातच बंद होणे आवश्यक आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर संपूर्ण गोव्यात विजेचे काम हाती घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे चांगले सहकार्य आपल्याला मिळत आहे. भूमिगत वीज वाहिन्या घालण्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर रस्त्यावर चर मारण्यात येतील. काही महिन्यांसाठी लोकांना त्रास सहन करावा लागेल. परंतु भविष्यात याचा निश्चितच फायदा होणार असल्याने लोकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील सहा महिन्यांत काम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
आमदार कामत यांनी वीज खात्याच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना इच्छाशक्ती वापरून काम करा, असे आवाहन केले. आमदार तुयेकर यांनी समस्या मंत्र्यांसमोर मांडून त्या सोडवण्याची मागणी केली.