- सुशांत कुंकळयेकरमडगाव: सेलेब्रिटी परफ्युमर मोनिका घुर्डे खून प्रकरणाची सुनावणी सध्या म्हापशाच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू झाली असून, या प्रकरणात या खुनाची पहिली वर्दी देणा-या तिच्या मोलकरणीची नुकतीच साक्ष नोंदवून घेण्यात आली. वासावरून अत्तरांचा दर्जा ओळखणा-या मोनिकाच्या या कसबामुळे सेलिब्रिटींच्या विश्वात तिला फस्ट लेडी ऑफ स्मेल म्हणून ओळखले जायचे.आपल्या पतीपासून विभक्त झालेली ही मुळची फोटोग्राफर व त्यानंतर फॅशन डिझायनिंगमधून परफ्यूमच्या क्षेत्रत उतरलेल्या मोनिकाचा सांगोल्डा-म्हापसा येथील सपना राज व्हेली या अपार्टमेंटमध्ये 6 ऑक्टोबर 2016 रोजी खून झाला होता. आपल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर मोनिका गोव्यात येऊन राहू लागली होती. या अपार्टमेंटमध्ये ती असताना याच कॉलनीचा सिक्युरिटी गार्ड असलेल्या राजकुमार सिंग याने तिच्यावर लैगिंक अत्याचार करून नंतर तिचा गळा आवळून खून केला होता. या घटनेनंतर तिच्या मोलकरणीने दार उघडण्याचा दुस-या दिवशी सकाळी प्रयत्न केला होता. मात्र घरातून कुठलाही प्रतिसाद न मिळत असल्याने तिच्या शेजारी राहणा-या एका महिलेकडे असलेल्या डय़ुप्लीकेट चाव्यांचा वापर करून हा अपार्टमेंट उघडला असता मोनिकाचा मृतदेह सापडला होता.साळगावचे पोलीस निरीक्षक संतोष देसाई यांच्याशी या संबंधात संपर्क साधला असता, या प्रकरणात संशयितावर आरोप निश्चित झाले असून, साक्षीपुरावेही सुरू झाले आहेत, अशी माहिती दिली. या प्रकरणात 6 जानेवारी 2017 रोजी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. पोलिसांच्या आरोपपत्रंप्रमाणे, राजकुमार सिंग याने हा खून केला होता. त्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पळून जाण्यापूर्वी त्याने पर्वरी येथील एका एटीएममधून पैसे काढले होते. या एटीएमच्या सीसीटीव्हीवर संशयिताची छबी सापडल्याने पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकले होते.39 वर्षांच्या मोनिका हिने भारत राममृथम या प्रसिद्ध फोटोग्राफरशी लग्न केले होते. पण खुनाची ही घटना घडण्याच्या एका वर्षापूर्वी मोनिका त्याच्यापासून विभक्त झाली होती. त्यानंतर ती गोव्यात येऊन राहू लागली होती. एक आघाडीची परफ्युमर म्हणून तिने अल्पावधीतच नाव कमविले होते. केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही तिचे नाव पसरले होते. ज्या संशयिताने हा खून केल्याचा दावा करण्यात आला आहे, त्याने पूर्वी मोनिकाची छत्री चोरली होती. त्यामुळे त्याला मोनिकाकडून फैलावर घेण्यात आले होते. याच कारणामुळे सूडाने पेटलेल्या सिंगने रात्री तिच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करुन तिचा खून केला होता.
सेलिब्रिटी परफ्युमर मोनिका घुर्डे खून प्रकरणाची सुनावणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 5:44 PM