सदगुरू पाटील
पणजी : गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी श्रीपाद नाईक यांचे नाव पुढे आलेले आहे. मात्र भाजपामधील एक गट व सत्ताधारी आघाडीतीलही एक गट श्रीपाद नाईक यांच्या विरोधात सक्रिय झालेला आहे. तात्पुरते असो किंवा कायमस्वरुपी असो पण मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळावे म्हणून भाजपाचे काही आमदार व भाजपाबाहेरीलही काहीजण जोरदार लॉबिंग करत आहेत.
केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक दिल्लीत आहेत. खासदार नरेंद्र सावईकर आणि राज्यसभा खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर हेही दिल्लीत आहेत. श्रीपाद नाईक यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चर्चेसाठी दिल्लीला बोलावले असल्याची चर्चा गोव्यात सुरू झाली होती. मात्र त्यात तथ्य नाही. लोकमतने श्रीपाद नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, आपण दिल्लीत आहे पण आपल्याला कुणाकडूनच चर्चेसाठी वगैरे बोलावणे आलेले नाही, असे नाईक यांनी सांगितले.
गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेतृत्वाखाली सहा आमदारांचा गट संघटीत आहे. त्यात तीन अपक्ष आमदारांचाही सहभाग आहे. मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांना शह देण्यासाठी सहा आमदारांच्या गटाने श्रीपाद नाईक यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सूचविले असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे लोकमतने गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व मंत्री विजय सरदेसाई यांना विचारले असता, ते म्हणाले की या चर्चेत तथ्य नाही. आम्ही सध्या गणोशोत्सवाच्या सुट्टीवर असल्यासारखे आहोत. आम्ही कोणत्याच प्रकारच्या लॉबिंगशीही संबंध ठेवलेला नाही. आम्ही भाजपाच्या केंद्रीय निरीक्षकांशी जी काय चर्चा करायची ती यापूर्वी केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याच निर्णयाची आम्हाला प्रतिक्षा आहे.
दरम्यान, भंडारी समाजात जन्मलेले श्रीपाद नाईक हे गोव्यातील बहुजन समाजाचे नेते आहेत. मनोहर पर्रीकर यांना आजारपणामुळे मुख्यमंत्री म्हणून काम पुढे नेणे कठीण बनल्याने व त्यांचा बहुतांशवेळ रुग्णालयातच जात असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत नाईक यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची तात्पुरती धुरा सोपविली जाऊ शकते. मात्र भाजपाप्रणीत सत्ताधारी आघाडीचा घटक पक्ष असलेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष ते मान्य करील काय तसेच भाजपामधील पर्रीकर समर्थक देखील ते मान्य करतील काय हा मोठा प्रश्न आहे. आम्ही भाजपाचे आमदार असून आमच्यापैकीच एखाद्याकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा दिला जावा अशी भूमिका यापूर्वी भाजपाच्या काही आमदारांनी मांडलेली आहे. आमदार निलेश काब्राल यांनीही यापूर्वी तसेच भाजपाच्या निरीक्षकांना सांगितले आहे.