म्हापसा : उत्तर गोव्यातील सुप्रसिद्ध अशा कळंगुटच्या किनारी भागात पर्यटन संबंधित सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडे ३५० कोटी रुपयांची मागणी करणार असल्याची माहिती कळंगुटचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी दिली. कळंगुट येथे ते पत्रकारांशी बोलत होते.गोवा सरकारच्या पर्यटन खात्यामार्फत मागणीचा प्रस्ताव केंद्रीय पर्यटन मंत्रालयाला पाठवण्यात येणार आहे. हा निधी त्वरित मंजूर व्हावा म्हणून आपण स्वत: केंद्रीय मंत्रालयाकडे दिल्लीला जाऊन या संबंधीचा पाठपुरावा करणार असल्याचे लोबो म्हणाले. सध्या केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेखाली येथील सुशोभीकरणासाठी मिळालेला ९ कोटी खर्चून सुरू असलेल्या कामाची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.कळंगुट, कांदोळीमध्ये वर्षाचे बाराही महिने पर्यटक येतात. यात देश-विदेशातील पर्यटकांचा समावेश आहे. पावसाळ्यात १५ हजार तर पर्यटक हंगामात ४० हजार प्रत्येक दिवशी या भागाला भेट देतात. त्यांना मोठ्या प्रमाणात गाड्या पार्किंग व इतर सेवा सुविधांची गरज असल्याचे या प्रस्तावातून ही मागणी करण्यात येणार आहे.कळंगुट ते बागापर्यंत मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटवावी असा आदेश उत्तर गोवा विकास प्राधिकरणाने काढला आहे. त्यानुसार येथील अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू असून, तेथे दुचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात येईल. पत्रकारांनी विचारलेल्या अन्य एका प्रश्नावर आमदार लोबो म्हणाले येथे पर्यटक मौजमजा करण्यासाठी येतात. त्यांना नाईट लाईफ हवे असते. त्यावर निर्बंध घालता येणार नाही. सिंगापूर, श्रीलंका येथे दिवसाचे चोवीस तास पर्यटकांना खुले असतात. त्यामुळे इथल्या भागात नाईट लाईफ असणे चुकीचे नसल्याचे मायकल लोबो म्हणाले.
कळंगुटच्या विकासासाठी केंद्राकडे ३५० कोटींची मागणी करणार : आमदार लोबो
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 4:35 PM