पणजी : गोव्यात बोरी येथे होऊ घातलेल्या नव्या पुलासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ३ लाख ९३ हजार १८४ चौरस मिटर भूसंपादनासाठी अधिसूचना जारी केली असून जनतेकडून २१ दिवसांच्या आत हरकती व सूचना मागवल्या आहेत.
राष्ट्रीय महामार्ग ५६६ वर या पुलास जोडून ५.३३ कि.मी.चा बगलमार्गही येणार आहे. संपादित केलेल्या जमिनीसाठी नागरिकांनी त्यांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास विशेष भूसंपादन अधिकारी, बांधकाम खाते, राष्ट्रीय महामार्ग, आल्तिनो, पणजी येथे लेखी स्वरूपात सादर करावयाच्या आहेत. लोटली, बांदोडा, बोरी , कवळें गावातील जागा संपादित करण्यात आली आहे. संपादित जमिनीचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध असून तो पाहून आक्षेप, सूचना सादर करता येतील.
नवीन बोरी पुलासाठी या भूसंपादनाकरिता ३०५ कोटी रुपये केंद्राने मंजूर केले होते. परंतु भूसंपादन झाले नव्हते. झुवारीवर सध्या असलेल्या ३० वर्षे जुन्या पुलासाठी हा नवीन पूल पर्याय ठरणार आहे. बोरीहून बायपासने तो थेट लोटली येथे जोडला जाईल. या पुलासाठी ठाणे, मुंबई येथील टॅक्नोजॅम कन्ट्रक्शन्स कंपनीने सल्लागार म्हणून काम केले आहे. पूल बांधून पूर्ण झाल्यानंतर साबांखाच्या स्वाधिन करेपर्यंत सल्लागार म्हणून या कंपनीची जबाबदारी राहील.